Home > Thoughts । विचारांवर चर्चा > एक वेगळंच कॉफी शॉप

एक वेगळंच कॉफी शॉप

एक वेगळंच कॉफी शॉप

कॉफीचा शोध, आज ज्याला आपण इथियोपिया म्हणतो त्या देशात लागला. मग अरब व्यापाऱ्यांनी कॉफी आफ्रिकेतून अशिया आणि युरोप मधे नेली. तुरकी आणि इतर देशात धर्मामुळे दारूबंदी असल्या कारणाने कॉफी अधिक प्रिय झाली. युरोपमध्येपण कॉफी लोकप्रिय झाली. सगळीकडे हळूहळू कॉफी विकायची आणि कॉफी बसून प्यायची दुकानं म्हणजे कॉफी शॉप सुरू झाली. कित्येक लोकं रोज मजा म्हणून, किंवा नवी फॅशन म्हणून कॉफी प्यायला लागले. जशी कॉफी शॉप वाढू लागली त्याच बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट झाली. लोकं एकत्र येऊन कॉफी पिता पिता गप्पा मारू लागली, इतर अनोळखी लोकांना भेटू लागली आणि व्यापारही करू लागली. मग बरेच कलाकार एकत्र येऊन आपल्या कला सादर करू लागले. कॉफी पिताना लोकांना नवीन संगित, नवीन शायरी आणि नवीन गाणी कॉफी शॉप मधे ऐकू येऊ लागली. आज या गोष्टी अगदी साध्या आणि सोप्या वाटतात पण त्या काळासाठी ही कला आणि व्यापार या क्षेत्रात क्रांति होती. मोठे शापखाने नसताना, संगणक नसताना किंवा इतर यंत्र नसतानाही कला सामान्य माणसापर्यंत कॉफी व्दारे पोचू लागली. माझी एका वेगळ्या कॉफी शॉपची कल्पना याच जुन्या कल्पनांवर आधारीत आहे.

दुर्दैवाने आजच्या समाजात कलेचं महत्व कमी झालेलं दिसतं. म्हणून नव्या कलाकारांना खुप ‘स्ट्रगल’ करावं लागतं. प्रोत्साहन, कौतुक किंवा बरोबर मार्गदर्शन न मिळाल्याने आपण कितीतरी कलाकार गमवून बसतो. कित्येक लोकांकडे कला असते पण सतत टिका ऐकून आत्मविश्वास इतका कमी झाला असतो की मग त्या कलेतही त्यांना आनंद मिळत नाही. आपल्या समाजाला जशी डॉक्टर आणि इंजिनियरांची गरज आहे तशीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त चित्रकारांची, गायकांची आणि इतर कलाकारांची गरज आहे. हे कलाकार समाजाचे सगळे चटके सहन करून समाज्याच्या हृदयात जाऊन बसणारी गाणी, चित्र आणि कविता लोकांपर्यंत पोचवत असतात. मी असं म्हणत नाही की त्यांनी ‘स्ट्रगल’ करू नये. उलट ‘स्ट्रगल’ केल्याने कलाकाराचे रंग अजून चांगले दिसतात. आंबा पिकायला जसं उष्णता लागते तसच समाजचे चटके सहन करून कलाकार पिकतो म्हणजेच त्याची कला पक्की होते. म्हणूनच मला तो ‘स्ट्रगल’ काढून घ्यायचा नाही पण या नव्या कलाकारांसाठी एक स्वतंत्र मंच तयार करावासा वाटतो. कितीतरी वेळा नव्या फोटोग्राफर्सकडे किंवा चित्रकारांकडे प्रदर्शनासाठी पैसे नसतात. लेखकांकडे किंवा कविंकडे पुस्तक छापण्याएवढे पैसे नसतात आणि मोठे प्रकाशक नव्या लेखकांची पुस्तके छापायला घाबरतात. संगितकारांकडे अल्बम काढायसाठी किंवा त्यांचं संगित लोकांपर्यंत पोचवायसाठी पैसे नसतात, साधनं नसतात. काही लोक असेही असतात की ज्यांना स्वत:वर विश्वास नसतो किंवा आवड असते पण पुढे काय आणि कसं करायचं हे माहित नसतं. अशा लोकांना मार्गदर्शन आणि कौतुकाची गरज असते. ही झाली कलाकारांची बाजू. आता लोकांची बाजू बघितली तर काही लोकांना खरंच कलेची, चित्रांची किंवा नव्या लेखांची आवड असते, पण ते नक्की कुठे मिळतील हे माहित नसतं. जसा पैस्याचा प्रश्न कलाकाराला येऊ शकतो तसाच रसिकांनापण येऊ शकतो. काहींना आवड आहे पण महाग चित्र किंवा पुस्तक विकत घ्यायचं हे पाकिटाला परवडत नाही. यांना पण विचार मांडायला किंवा नव्या कलेचा आस्वाद घ्यायला एक जागा, एक मंच पाहिजे असतो. या नव्या आणि वेगळ्या कॉफी शॉपची कल्पना हीच आहे.

तुम्ही कॉफी प्यायला गेलात की तुमचं स्वागत करायला वेटर म्हणून एखादा नवा कलाकार उभा आहे. त्याला तुमच्या प्रति आदर असणारच कारण तुम्ही त्याचं चित्र, किंवा त्याचं पुस्तक किंवा त्याचं गाणं बघायला, वाचायला किंवा ऐकायला आला आहात. तुम्हाला रसिक म्हणून पण या वेटर आणि कलाकाराविषयी आदर आणि आपुलकी निर्माण होईलच कारण तुम्हाला त्याची कला बघायची आहे आणि त्याला वेटर होण्यात पण कसलाही कमीपणा जाणवत नाही. लगेच तुमचं आणि त्याचं काही न बोलता एक नातं तयार होतं. मग कॉफी शॉपच्या आत भिंतींवर प्रदर्शन असल्यासारखे फोटो किंवा चित्र बघायला मिळतात, विकत घ्यायला मिळतात. फोटोग्राफर आणि चित्रकार पण तिथे उभे राहून तुम्हाला त्यांच्या कामाविषयी सांगणार, त्यांची माहिती देणार. तुम्हाला पण त्यांना प्रश्न विचारता येणार उदा. हा फोटो काढण्यामागचा हेतू काय? किंवा हे चित्र काढताना तुमच्या मनात काय होते? कॉफी पिताना निवांत बसून एखाद्या नव्या कलाकाराचं गाणं किंवा संगितही ऐकता येईल. उद्या कदाचित तो लोकप्रिय झाला, मोठा कलाकार झाला तर तुम्ही पण सांगू शकाल की तुम्ही त्याला प्रसिध्द केलत. जर संगिताची आवड नसेल तर नवे लेख वाचता येतील किंवा कविता ऐकता येतील. ज्या कविंकडे किंवा लेखकांकडे भरपुर पुस्तकं छापण्याइतके पैसे नसतील, ज्यांनी २०-३० प्रतिच छापल्या असतील त्यांचे काव्य विकत घेता येईल, ऐकता येईल. कोणत्या मोठ्या कविच्या पहिल्या काव्यवाचनाच्या कार्यकमाला हजर राहाणं हे पण सुदैवाची गोष्ट आहे. त्या कविसाठीपण हे खुप महत्वाचं असेल कारण तो पण नवाच असेल. म्हणून त्यालाही तुमच्यासमोर कविता वाचायचा तेव्हडाच उत्साह असेल. जर जागा असेल तर नाटक वाचन करता येईल, किंवा नाटक सादर पण करता येतील. कलाकारांना पण हे कॉफी शॉप त्यांचा आवाज असल्यासारखं होईल. त्यांची कला लोकांपर्यंत इतक्या सोप्या प्रकारे पोचवलेली त्यांनाही आवडेल. त्यांना प्रोत्साहन मिळेल, आत्मविश्वास वाढेल. ‘आज मी ३० लोकांसमोर कविता सादर केली’, ‘आज मी गाताना भरपुर लोकांनी टाळ्या वाजवल्या’ किंवा ‘आज माझे पहिले चित्र विकत गेले’ असे ते पण अभिमानाने सांगू शकतील. जर कॉफी प्यायला येणाऱ्या रसिकात एखादा प्रसिध्द फोटोग्राफर, लेखक किंवा संगितकार असेल तर कलाकारांना मार्गदर्शन पण मिळेल. जर चांगल्या आणि सारखे विचार असलेल्या लोकांची मदत मिळाली तर हे कॉफी शॉप लोकप्रिय तर होईलच पण कलाकार आणि रसिकांमधलं एक अतुट नातं होईल.

पण या कॉफी शॉपचे काही नियम असतील. कदाचित नियम काळानुसार बदलतीलही पण मला वाटणारे नियम हे आहेत. पहिला म्हणजे सगळे लोक एकामेकांना आदराने वागवतील आणि कोणी छोटं किंवा मोठं नसेल. कलाकारात आणि रसिकात कसलाही भेदभाव नसला की आपोआप एकामेकांना समजून घ्यायची भावना निर्माण होते. दुसरा नियम मी माझ्या बहिणीकडून घेतला आहे. तिच्याच शब्दात सांगायचं तर ‘तुमच्याकडे काही चांगलं बोलायला नसेल, तर गप्प बसा’. म्हणजेच जर एखाद्या चित्रा विषयी किंवा गाण्याविषयी काही चांगलं बोलायचं नसेल, तर गप्प राहा पण त्याची चेष्टा किंवा अपमान करू नका. हा नियम पण महत्वाचा आहे कारण कलेचा अपमान केला तर कलाकाराला दु:ख होतं आणि मग तो व्यक्त करणं सोडून देतो. (कदाचित पुढे गेल्यावर नियम वाढतील, पण आता तरी इतकेच नियम करावेसे वाटत आहेत.)

पण हे कॉफी शॉप म्हणजे एक नवा प्रयोग असेल. प्रत्येका नव्या प्रयोगाला सफल व्हायला वेळ लागतो, तो त्याचा संघर्ष असतो, ‘स्ट्रगल’ असतो. आज ही माझ्या डोक्यातली कल्पना आहे, अजून भरपुर विचार बाकी आहेत. या विचारावर भरपुर सुधारणा करता येतील. कॉफी शॉप जसं मोठं होईल तसं अजून कितीतरी गोष्टी करता येतील. हे कॉफी शॉप म्हणजे पण एक कला बनेल, आणि कलेला वाढवण्यासाठी काही बंधनं नसतात. आपली कल्पनाशक्ति हेच एक बंधन. अजून मी या विषयावर सगळ्या बाजूंनी विचार करतोच आहे, पण तुमच्यापुढे या विचाराची सुरूवात तरी मांडावीशी वाटली. असं कॉफी शॉप विकत घ्यायला आणि स्थापीत करायला पैसे कुठून येतील, जागा कुठे मिळेल, लोकांना हे आवडेल का असे कितीतरी प्रश्न अजून अनुत्तरीत आहेत. पण एक स्वप्न किंवा एक ध्येय म्हणूनतरी हे छान आहे. स्वप्न बघितलीच नाहीत तर ती खरी कशी होतील, आणि कॉफी असेल तर काहीही खरं करता येईल.

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
  1. No comments yet.
  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: