Home > Thoughts । विचारांवर चर्चा > जगातला सर्वात भयानक शब्द

जगातला सर्वात भयानक शब्द

जगातला सर्वात भयानक शब्द

आपण बातम्यात ऐकतो की या देशाकडे असले बॉम्ब आहेत आणि त्या देशाकडे तसली हत्यारं आहेत. ही बंदूक सर्वात जास्त खतरनाक आहे किंवा असा-असा माणूस सर्वात भयानक आहे. पण कधी विचार केलाय का की कुठला शब्द सर्वात खतरनाक आहे? खतरनाक शब्द म्हटलं की लगेच शिव्यांची आठवण येते. पण शिव्या हे क्षणिक रागाचं प्रतिक आहे. बऱ्याच वेळा लोक समोर नसताना त्यांना शिव्या दिल्या जातात, आणि म्हणूनच त्या भयानक होत नाहीत. किंवा जरी तोंडावर कोणाला शिव्या दिल्याच तरी ते त्या लगेच व्याजासहीत आपल्या पदरात परत टाकतात, म्हणून त्या खतरनाक न होता देवाण-घेवाण केलेल्या वस्तूसारख्या होतात. मग परत प्रश्न तोच की, जगातला सर्वात नुकसान करणारा शब्द कोणता? थोडा विचार केल्यावर मला असा शब्द सापडला. ‘नाही’ हा सर्वात भितीदायक शब्द आहे. इतका साधा, वाईट न दिसणारा, रोजच्या वापरातला, ‘हो’ च्या सभ्य आणि जगमान्य विरोधात जगणारा हा शब्द इतका खतरनाक का? पण वाईट न दिसणं, हा या शब्दाचा विशेष गुण आहे.

माझा हा दावा सिध्द करायला आपण काही उदाहरणं बघुया. कधी एका प्रेमिकेने एका प्रेमीला ‘नाही’ म्हटलं तर काय होतं पाहिलय का? किंवा ती ‘नाही’ म्हणेल म्हणून कित्येक ‘तों’नी त्यांचं प्रेम कधी हृदयातून जिभेपर्यंत आणलंच नाही. बरेच लोक म्हणतात की ‘अरे, प्रयत्न करून बघायचा, फारतर फार काय होईल? नाही म्हणेल?’ पण या नाही ऐकण्याची भिती आणि नाही सहन करायला लागणारी ताकद भरपूर असते. प्रेमाचं सोडलं तरी हा खतरनाक शब्द वेगवेगळ्या रूपात सगळीकडे बघायला मिळतो. ‘तुम्हाला ही नोकरी आम्ही देऊ शकत नाही’, ‘तुला हे करता येणार नाही’, ‘असं होऊच शकणार नाही’ किंवा ‘मी हे करू शकतो का नाही?’ अशी कितीतरी उदाहरणं रोज आपल्या डोळ्यासमोर येतात. एका दिवसात आपण कित्येक लोकांकडून हा हानिकारक शब्द ऐकत असतो आणि आपल्याला न कळू देता ‘नाही’ आपलं खूप मानसिक नुकसान करत असतो. नाही या एका शब्दाच्या जोरावर आपल्या मनात अनेक संकटाच्या भिंती उभ्या होतात. सगळ्याच भिंती तोडता नाही आल्या तरी त्या आहेत हे ओळखता तरी आलं पाहिजे. आणि कधी-कधी तर या भिंती ओळखता आल्या तर त्या आपोआप पडतात.

माझ्या मते २ वेगवेगळ्या प्रकारचे ‘नाही’ असतात. पहिला म्हणजे निर्णय न घेऊ देणारा ‘नाही’. याची उदाहरणं म्हणजे “मी हा प्रश्न विचारू का नको? सगळ्यांसमोर मी वेडा तर वाटणार नाही ना?” किंवा “मला अमूक करायचय पण ते लोकांना आवडलं नाही तर?” हा पहिला ‘नाही’ आपल्याला माहित नसलेली उत्तरे ‘नाही’ आहेत असं सांगतो. आपण परत एका प्रेमीचं उदाहरण घेऊयात. “तिला विचारलं तर आवडेल का नाही?” हा प्रश्न प्रेमीच्या मनात भिती निर्माण करतो. किंवा ‘मला ही नोकरी मिळेल का नाही?’ अशा बाबतीत होण्याची किंवा न होण्याची शक्यता समान असते पण आपलं मन ‘नाही’या उत्तराला घाबरून प्रयत्न करायलाच विसरतं. एका हॉकी खोळाडूने एक सुंदर विधान केलं होतं. तो म्हणाला होता “मी न मारलेले शॉट १००% चुकतात.” मस्त वाक्य आहे हे. तो म्हणत होता की जर त्याने शॉट मारायचा प्रयत्नच नाही केला तर चुकायची शक्यता १०० टक्के असते आणि गोल व्हायची शुन्य टक्के. पण जर त्याने प्रयत्न केला तर गोल व्हायची शक्यता किमान ५० टक्के असते. त्या ५० टक्क्यात त्याचा अनुभव आणि सराव जोडला तर ५० चे ७० टक्के आरामात होतात. पण जर त्यानेच असं ठरवलं की गोल होणारच नाही आणि म्हणून शॉट मारलाच नाही तर गोल कधीच होणार नाही. म्हणूनच या पहिल्या ‘नाही’च्या भितीमुळे प्रयत्न सोडायचे नाहीत. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा वाटते तेवढी नंतर अवघड नसते.

दुसरं ‘नाही’ आपल्याला लोकांकडून मिळतं आणि मग ते आपल्यातल्या नाहीला जागं करतं. “तू हे करू शकणार नाहीस” किंवा “तुला हे झेपणार नाही” असं ऐकून लगेच आपल्याला हा दुसरा ‘नाही’ म्हणतो “मी हे नाही करू शकणार” किंवा “मला हे नाही झेपणार”. पहिला नाही जर प्रयत्न करण्यापासून आपल्याला घाबरवतो तर हा दुसरा आपल्या आत्मविश्वासावर हल्ला पुकारतो. माणूस लोकांच्या बोलण्यामुळे बराच खचून जातो. आत्मविश्वास कमी झाला की सरावल्या हातांनाही कंप सुटायला लागतो. परिक्षेत सहज सुटणारं गणीतं अचानक अडकतं, घाम फुटतो. या वरचा उपाय शोधायला आपण लहान मुलांकडे बघितलं पाहिजे. डॉक्टर आपल्याला सांगतात की लहान मुलांना तुम्ही हे नको करूस असं म्हणालात तर ते तेच काम आधी करतात. आपणही आपल्याला आवडणारं किंवा बरोबर वाटणारं काम कोणाचही न ऐकता, लहान मुलाच्या जिद्दीने करत राहिलं पाहिजे. कदाचित म्हणूनच पिकासो म्हणाला होता की मोठं होणं फार सोपं असतं, पण मोठं होताना आपल्यातल्या लहान बाळाला जिवंत ठेवणं कठीण असतं. आणि ‘तू हे करु शकणार नाहीस’ असं लोकांकडून ऐकल्यावर, जर आपण तेच काम करून दाखवलं तर त्याचा आनंद वेगळाच असतो. लोकं नको म्हणतात म्हणून काहीही करू नये पण आपल्याला पटतय म्हणून करावं. जसं एखादा बॅट्समन दरवेळि शुन्यातून सुरूवात करतो, तसं अपला अत्मविश्वास कमी असेल तर आपणही सोपी कामे आधी करून मग अवघड कामांकडे वळावं. परिक्षेत नाही का आपण सोपे प्रश्न सोडवल्यावर कठीण प्रश्नांना जास्त वेळ देऊ शकतो, तसंच.

‘नाही’ हा शब्द सर्वात हानिकारक शब्द आहे कारण तो आपला विश्वास कमी करतो, आपल्याला घाबरवतो आणि आपल्याला निर्णय घेऊ देत नाही. थोडक्यात ‘नाही’ हा सगळ्या नकारात्मक भावना आपल्यात नकळत निर्माण करतो. ‘नाही’ वर उपाय मिळाले नाहीत तरी अशी भिंत आपल्यासमोर आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं. ‘हे होणार नाही, ते मला जमणार नाही.’ असं स्वत:ला सांगण्यापेक्षा ‘हे कसं होऊ शकेल? हे मला कसं जमेल?’ असे प्रश्न विचारा. तुमचं मन उत्तरं शोधण्यात पटाईत आहे, त्याला ‘नाही’च्या डेड एंडला पाठवू नका.

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
 1. prasaad
  April 19, 2011 at 5:40 am

  Tu bhefaat aahes Mitra !
  Mala shakya zale tar tuza cel number mazya mailbox or message madhye pathav , udya or parva Sangeeta tai kade jatoy , Tevha tuzya To & Tee ghewun jatoy , tyanna bolawese watale tar mee phone karen !

 2. charu s k
  April 19, 2011 at 10:10 am

  जगातला सर्वात भयानक शब्द “नाही” ….. खुप छान लिहिले आहेस .

 1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: