Home > Thoughts । विचारांवर चर्चा > डोंगराला आग लागली पळा पळा

डोंगराला आग लागली पळा पळा

डोंगराला आग लागली पळा पळा

काही दिवसांपूर्वी आमच्या जवळच्या डोंगराला आग लागली. डोंगरावर भरपूर झाडं होती आणि अचानक वणवा पेटला. आग पटकन पसरू लागली. नीळ आभाळ धुराच्या ढगांनी काळं पडू लागलं. काही तासातच आग सगळीकडे पसरत गेली, सगळं जाळत गेली. डोंगरावर राहणाऱ्या लोकांना लवकरात लवकर त्यांची घरं सोडावी लागली. आग पहाटेच लागल्यामुळे काहींना तर झोपेतून उठल्या-उठल्या घराबाहेर यावं लागलं. अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरूच होते, पण निसर्गाच्या जोरापुढे माणसाची जिद्द कमी पडत होती. या आगीच्या बातम्या सगळीकडे पसरू लागल्या आणि सगळीकडून मदत मिळू लागली. कित्येक घरं पेटली, कुटुंब हदरली आणि कित्येक गोष्टी नष्ट झाल्या. शेवटी आग विजवली गेली, निसर्ग शांत झाला आणि चांगली गोष्ट म्हणजे सगळी लोकं सुरक्षीत आणि जिवंत होती. पण या काही तासात त्या लोकांनी भरपूर सहन केलं होतं. सायरन, आरडा-ओरडा आणि इतर आवाजामुळे जागं झाल्यावर आपलं घर सोडावं लागलं तर काय होईल. मनात कितीतरी विचारांची गर्दी सुरू होईल हे काय चाललं आहे? नक्की काय होतय? हे स्वप्न तर नाही ना? सुरूवातीला असे विचार तर आग लागली आहे हे समजल्यावर वोगळेच विचार. मला घर सोडावं लागेल का? काही वस्तु माझ्याबरोबर घेता येतील का? कोणत्या वस्तु घ्याव्या? घर सोडलं तर जायचं कुठे? घर जळालं तर काय? काही महत्वाच्या गोष्टी आपण घ्यायला विसरलो, आणि त्या जळून गेल्या तर काय? याहून कित्येक प्रश्न असतील. आधीच घर सोडायचा धक्का, मनात परिवारासाठी आणि स्वत:साठी चाललेली काळजी, भविष्याची चिंता आणि असे अनेक अवघड प्रश्न डोळ्यासमोर त्या आगीसारखे नाचत असतील. तसं बघायला गेलं तर चूक कोणाचीच नव्हती. अचानक आग लागली, पण त्यामुळे कित्येक लोकांची जिवनं बदलली.

मला वाटतं आपल्या घराला आग नसेल लागली तरी आपण याचा विचार केला पाहिजे. जर आपल्या जिवनरूपी घराला आग लागली तर काय? लहानपणी आपण ‘डोंगराला आग लागली पळा पळा’ हा खेळ खेळतो. पण आपल्या जिवनात आग लागली तर आपण कुठे पळणार आहोत? आग म्हणजे एक नको असलेला बदल. मग तो एका अपघात एवढा तिव्र असेल किंवा मित्रांपासून दूर जाण्यासारखा साधा. खरंतर नको असलेले बदल हे क्वचितच ‘साधे’ असतात. ते आपल्याला अवघड प्रश्न विचारतात. कॉलेज संपल्यावर मित्रांपासून वेगळं झाल्यावर तुम्ही काय कराल? नोकरीसाठी शहर किंवा देश बदलावा लागला तर? एका अपघाताचा मानसीक ताण कसा सहन कराल, स्वत:ला सांभाळून पुढे कसे जात राहाल? फेल झालात, नोकरी गेली किंवा व्यापारात नुकसान झालं तरी या सगळ्याशी कसं लढाल? थोडक्यात तुमच्या डोंगराला आग लागल्यावर कुठे, किती आणि कसं पळाल? हे प्रश्न फार अवघड आहेत आणि यांची उत्तरं पण बदलतील पण मी माझे यावरचे विचार मांडतोय. या सगळ्याचं तीन गटात किंवा परिस्थितीत विभाजन करता येईल. आग लागण्याआधी, आग लागताना आणि आग विजल्यावर. आपण दु:खाला किंवा होणाऱ्या नुकसानाला या आगीचं रूप दिलय आणि ही आग आपल्या सगळ्यांच्याच जिवनात लागते. नको असलेल्या घटना घडतात, दु:ख होतं मानसीक किंवा आर्थीक नुकसान होतं आणि या नंतर काही धडे शिकायला मिळतात. दु:ख हे कमी-जास्त प्रमाणात होणारच आहे हे लक्षात ठेऊन आपण दु:ख होण्याआधी, दु:ख होताना आणि दु:ख झाल्यानंतर या ती अवस्था नीट तपासुयात.

आग कधीही लागू शकते, प्रसंग अचानक घडतात आणि दु:ख पण आपली परवानगी न विचारता येतं. ते म्हणतात ना, चांगल्या गोष्टी घडायला खूप वेळ लागतो पण वाईट गोष्टी पटकन, न सांगता घडतात. हे थोडं निराशावादी वाटेल, पण ही अपघाता आधीची तयारी आहे असं म्हणता येईल. अपघात झाल्यावर आपल्याला आधाराची गरज असते. काही वेळाने सगळं ठीक होणार असतं, पण त्या क्षणी ‘सगळं ठीक होईल’ हे विश्वासाने सांगणारी व्यक्ति लागणार असते. या औषधाचं नाव आहे मित्र. चांगले, विश्वासू आणि आपल्याला समजणारे मित्र किंवा जवळचे लोक ही देवाची देणगी असते. मित्रांचं महत्व सांगायची आवश्यकता नाही, म्हणून मी एका वेगळ्या विषयाकडे वळतो. चांगले मित्र असणं जितकं गरजेचं आहे तितकं एक गोष्ट लक्षात ठेचण्याचं आहे. आग लागल्यावर तुम्ही, तुम्हाला आवडतं ते वाचवायचा जिवापाड प्रयत्न करणार आहात, पण आग लागण्याआधीही तुम्ही त्या गोष्टीलाअ तेवढंच महत्व देता का? म्हणजे उद्या जर खरंच आग लागली तर तुम्ही तुम्हच्या कुटुंबाला वाचवायचा प्रयत्न कराल, पण आज तुम्ही त्याच कुटुंबाबरोबर किती वेळ घालवता? किती मजा करता, किती महत्व देता? महत्वाच्या गोष्टींचं किंवा लोकांचं महत्व पटवून द्यायला आपल्याला अपघाताची गरज नाही पडली पाहिजे. काही गोष्टींचं महत्व आपण वेळेत समजलं तर कित्येक अपघात टाळता येतात, दु:ख होत नाही. म्हणूनच आग लागण्याच्या आधीच ती कशी टाळता येईल ते बघा, आणि ती लागल्यावर कोणते मित्र मदत करायला येतील हे पण लक्षात ठेवा.

दुसरी अवस्था म्हणजे आग लागल्यावरची. काहीतरी मोठं घडलय, मनाला दु:ख झालय काय करावं ते कळत नाही? अशा वेळी काय कराल. जेव्हा त्या लोकांच्या घराला आग लागली होती तेव्हा त्यांना काय करावं ते कळत नव्हतं, कसं व्यक्त करावं, काय घेऊन घर सोडावं, सगळेच प्रश्न होते. आपल्या जिवनातही काही वाईट घडलं किंवा दु:ख झालं की असंच होतं अशा वेळी मानसीक ताकद लागते, जिद्द लागते. ‘आपण हे करू शकतो, स्वत:ला आता सावरून परत उभे राहू शकतो. आता पडलो आहोत पण परत उभे राहू शकतो, चालू शकतो.’ हे स्वत:ला आत्मविश्वासाने सांगावं लागतं. एकदा मनाने करायचा निर्णय घेतला की होतं. जेव्हा तुम्ही मनाला सांगता की काहीही झालं तरी मी या परिस्थितीपुढे गुढगे टेकणार नाही, लढत राहीन, तेव्हा मनात एक जिद्द निर्माण होते. आपल्याला भुतकाळात झालेल्या वाईट गोष्टी आठवतात. “आपण त्या सगळ्यातून वाचू शकलो, तर यातून पण मार्ग निघेल” असं आपण स्वत:ला बजावतो. हे सगळं सांगणं आणि लिहिणं सोपं असलं तरी ते त्या क्षणी करणं अवघड असतं. पण आपण बरेच वेळा ऐकतो की “आपण जितकं सहन करू शकतो तितकंच दु:ख देव आपल्याला  देत असतो.” याच वाक्याची दुसरी बाजू म्हणजे कितीही दु:ख झालं किंवा वाईट गोष्टी घडल्या तरी हे सगळं सहन करुन परत जगायची आणि आनंदात जगायची ताकद आपल्यात आहे. हे सगळं सोपं मुळीच नाही, पण अशक्यही नाही, हे पण तितकंच खरं आहे. आपन दु:खापासून पळायचा प्रयत्न करतो किंवा सगळं लपवायचा आणि विसरायचा प्रयत्न करतो. पण आनंदासारखंच दु:ख सुध्दा आपण अनुभवलं पाहिजे, त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे.

खेळताना पडल्यावर आपण त्या जखमेवर जसं औषध लावतो तसंच आग विजल्यानंतर आपण केलं पाहिजे. आग विजल्यावरही आपल्याला काम असतं. घर किती जळालय, किंवा कुठल्या गोष्टी जळाल्या नाहीत हे लक्षात येतं. पुढच्यावेळी आग कशी टाळता येईल हे कळतं. दु:ख झाल्यावर आपले खरे मित्र कोण ते कळतं. कठीण परिस्थितीतून वर आल्यावरच आपली मानसीक वाढ होते. आपल्याला स्वत:बद्दल बरंच काही कळतं. आपण कोण, आपली ताकद, आपला दृष्टीकोन, आपला स्वभाव, वृत्ती हे सगळं आपल्या पराभवांनीच आपल्याला जास्त समजतं. म्हणूनच वाईट होऊन गेल्यावर त्यावर रडत बसण्यापेक्षा आपण त्यातून हे सगळं शिकलं पाहिजे. काहीतरी वाईट घडलं की त्यात आपलीही चूक असतेच. मग आता वाईट गोष्ट होऊन गेल्यावर परत त्याच चूका करणार आहात का परिस्थितीला तोंड देत, त्यातून शिकून पुढे जाणार आहात? जळालेलं घर सोडून जाणार आहात का घर परत उभारणार आहात? तुम्ही एका वाईट प्रसंगातून बाहेर आलात याला जिवनदान मानणार आहात का झालेल्या नुकसानाकडे जास्त लक्ष देणार आहात. भविष्यातल्या आगी किंवा दु:ख्द अनुभव कसे टाळता येतील याचा पण विचार कराल का झालेल्यामुळे स्वत:च्या नशिबाला नावं ठेवणार आहात?

वाईट प्रसंग, घटना, अपघात किंवा नको असलेले बदल हे प्रत्येकाच्या जिवनाचा एक भाग आहेत. हे आपले विविध प्रकारे नुकसान करतात. पण शेवटी यांना अडचणी मानायचं का संधी म्हणून स्विकारायचं हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून आहे. आग आधी पण लागली होती आणि नंतर पण लागणार आहे, तुम्ही तिला कसे झेलता हे महत्वाचं आहे. आग कशी टाळता येईल ते बघा, खरे मित्र ओळखा आणि आवडणाऱ्या गोष्टींना महत्व आणि तुमचा अमूल्य वेळ द्या. सगळ्याच आगी झोलायसाठी आग लागण्याआधी, लागल्यावर आणि विजल्यावर काय करणार आहात यावर विचार करा.

— मयुरेश कुलकर्णी

Advertisements
  1. April 22, 2011 at 1:56 pm

    khupach chhaan 🙂

  2. prasad
    April 22, 2011 at 2:33 pm

    khoop satyata !!!

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: