Archive

Archive for April, 2012

अदृश्य शाई

April 20, 2012 1 comment

अदृश्य शाई

आज कोण जाणे कुठे कविता हरवली होती
तीने कागदापासून दूर मान फिरवली होती

कुठल्याही चौकटीत बसेल कशी ती, ज्या
कवितेत मी बंडखोरी मिसळली होती

बाजारात वाढला खोट्याचा भाव जेव्हा
देवांनी सत्य खोटी म्हणून खपवली होती

समजून घेतलेच नाहीस अर्थ तू कधी
उगीच तुला एखादी ओळ आठवली होती

ज्या कवितेत मी पाहिलेच नाही स्वत:ला
ती मी देवाकडे परत पाठवली होती

विसरायचेच असल्यास सगळेच विसरूयात
कारण सुकलेल्या वृक्षाला माती विसरली होती

ते माझ्या पापांच्या करत होते याद्या
त्यांच्या पापांची त्यांनी पुस्तके लपवली होती

आता तोल सांभाळून उभे शब्द खंबीर जिथे
आधी अदृश्य शाई कागदावर घसरली होती

— मयुरेश कुलकर्णी

मी नव्हतो

April 19, 2012 2 comments

मी नव्हतो

मी बाहेर पण नव्हतो, आत नव्हतो
त्यांच्यात बसून, त्यांच्यात नव्हतो

जगलो त्या तुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे
मिणमिणत्या दिव्याची वात नव्हतो

त्यांनी चांदणे विजवून टाकले तरी
एकटीच रडणारी मी रात नव्हतो

अफवात सत्य विरघळून गेले होते
चार-चौघांना पटेल अशी मी बात नव्हतो

ही लढाई कदाचित माझी नसावी
न मी विजय होतो, मी मात नव्हतो

काही गोष्टी असतात निश्चित मुत्युएवढ्या
तुला सोडून जाणारा मी हात नव्हतो

वेडेपणा जपून मी वय वाढवत होतो
मी चुकूनही हुशारांच्या वादात नव्हतो

दिलास जेव्हा तू हातात हात माझ्या
माझ्यात असलेला मी, माझ्यात नव्हतो

— मयुरेश कुलकर्णी