Archive

Archive for the ‘Poems । माझ्या काही कविता’ Category

पाय

पाय
पाय अवयव नसून, झाली आहे एक चळवळ
कधी विचारांवर डोलणे, तर कधी नुसती वळवळ

बरोबर चालले तर साथ
जोरात लागले तर लाथ
खेळायला लागले तर लंगडी
उगाच पसरले तर तंगडी

पावलांच्या आधी येतो, तो पायगुण
चालून गेल्यावर उरते, ती पायांची खुण
पाय पसरून केली जाते, ती भुण्भुण

लोक लोकांच्या पाया पडतात
पाय लागला तर माफी मागतात
काही नुसतेच पाय धरतात
तर काही चक्क पाय खेचतात

थोरांचे पाय महान
लहानांचे लहान
कष्ट करणाऱ्यांचे घाण
तर बसून राहाणाऱ्यांचे छान?

पाय गुणी पण असतात
पाय घाण पण असतात
पादुकांच्या रूपाने पाय
नसूनही असतात

सगळ्यांना असतातच असे नाही, पाय
त्यातही वेगळा जगाचा न्याय
धडधाकटांच्या हातात कुबडी शोभे
तर जिद्दीने लंगडे राहातात उभे

— मयुरेश कुलकर्णी

परत कवि

March 10, 2013 6 comments

परत कवि

मी रिकाम्या कागदाचा
आदर करायला तयार आहे
मी लेखणीतल्या शब्दांचा
भार उचलायला तयार आहे

कविता जगून मग लिहीन
ही प्रतिज्ञा करतो मी
सर्वात वरून येणारीच
ही आज्ञा पाळतो मी

शाईने उतरवलेल्या विचारांची
जबाबदारी साधी नसते
‘कचरा’ म्हणून लिहिलेली
कविता ही रद्दी नसते

रक्तातले कागदावरच्या
शब्दात बसवायचा प्रयत्न करतो
आज परत बऱ्याच दिवसांनी
मी कवि बनायचा प्रयत्न करतो

— मयुरेश कुलकर्णी

अदृश्य शाई

April 20, 2012 1 comment

अदृश्य शाई

आज कोण जाणे कुठे कविता हरवली होती
तीने कागदापासून दूर मान फिरवली होती

कुठल्याही चौकटीत बसेल कशी ती, ज्या
कवितेत मी बंडखोरी मिसळली होती

बाजारात वाढला खोट्याचा भाव जेव्हा
देवांनी सत्य खोटी म्हणून खपवली होती

समजून घेतलेच नाहीस अर्थ तू कधी
उगीच तुला एखादी ओळ आठवली होती

ज्या कवितेत मी पाहिलेच नाही स्वत:ला
ती मी देवाकडे परत पाठवली होती

विसरायचेच असल्यास सगळेच विसरूयात
कारण सुकलेल्या वृक्षाला माती विसरली होती

ते माझ्या पापांच्या करत होते याद्या
त्यांच्या पापांची त्यांनी पुस्तके लपवली होती

आता तोल सांभाळून उभे शब्द खंबीर जिथे
आधी अदृश्य शाई कागदावर घसरली होती

— मयुरेश कुलकर्णी

मी नव्हतो

April 19, 2012 2 comments

मी नव्हतो

मी बाहेर पण नव्हतो, आत नव्हतो
त्यांच्यात बसून, त्यांच्यात नव्हतो

जगलो त्या तुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे
मिणमिणत्या दिव्याची वात नव्हतो

त्यांनी चांदणे विजवून टाकले तरी
एकटीच रडणारी मी रात नव्हतो

अफवात सत्य विरघळून गेले होते
चार-चौघांना पटेल अशी मी बात नव्हतो

ही लढाई कदाचित माझी नसावी
न मी विजय होतो, मी मात नव्हतो

काही गोष्टी असतात निश्चित मुत्युएवढ्या
तुला सोडून जाणारा मी हात नव्हतो

वेडेपणा जपून मी वय वाढवत होतो
मी चुकूनही हुशारांच्या वादात नव्हतो

दिलास जेव्हा तू हातात हात माझ्या
माझ्यात असलेला मी, माझ्यात नव्हतो

— मयुरेश कुलकर्णी

थोडंसं

March 12, 2012 5 comments

थोडंसं

संपवता आलं नाही तरी सुरू करावं थोडंसं
वाटलं आज तुझ्यासाठी लिहावं थोडंसं

मरणारे त्यांच्या कार्यामुळे जगतात
जगणाऱ्यांनी पण जगावं थोडंसं

व्याकरणाच्या चूका काढतील सारेच
कविता कोण वाचतय, बघावं थोडंसं

ओठांना मी परवानगी दिली नाही कधीच,
की तुझ्या विरूध्द त्यांनी बोलावं थोडंसं

माझ्या कवितेला ताल नसला तरी
अश्रुंनी बेताल शब्दात, डोलावं थोडंसं

आंधळे बघतात स्वप्ने सप्तरंगी
डोळस हुशारांनाही दिसावं थोडंसं

ती हसायची लोकांची सवय सभ्य नाही
देवानेही रडणाऱ्याबरोबर रडावं थोडंसं

संपल्यावरही माझी जीवन-कविता
स्वार्थ इतकाच की, तू वाचावं थोडंसं

एक मात्र जगाचा कायदा असा आहे
मी रडताना इतरांनी हसावं थोडंसं

मुरले नाहीत हे शब्द भिकारी कुठेही
तरी पोचलं पाहिजे असं पोचावं थोडंसं

— मयुरेश कुलकर्णी

कविता घडत गेली

September 23, 2011 1 comment

कविता घडत गेली

कागदावर शाई पडत गेली
माझी कविता घडत गेली

ती येताना असंख्य तारे
तिच्या पदरात घेऊन यायची
जाताना जणू आकाश आणि
माझा चंद्र घेऊन जायची

आज एक चांदणी रडत होती
तरी माझी कविता घडत होती

हल्ली ती येतही नाही
तारे पदरात घेतही नाही
चंद्राचा जीव थोडा-थोडा होतो
ती त्याला कुठे नेतही नाही

ती ताऱ्यांची शिडी चढत होती
आणि माझी कविता घडत होती

आता माझा चंद्र मी
सोबत घेऊन चालतो
आकाशाचा पदर पांघरून
तिच्या ताऱ्यांशी बोलतो

आता ती परी सारखी उडत होती
ऐकटीच माझी कविता घडत होती

कविता होतच असतात
माझ्याकडे बघतच बसतात
ज्या तिच्या ओळी असतात
त्या तिच्यासारख्याच हसतात

रडणारी चांदणी रडून गेली
घडणारी कविता घडून गेली

— मयुरेश कुलकर्णी

चारोळी

चारोळी

प्रश्न असा पडतो मला की
मी तुला कळलो का नाही?
तुझ्यासाठी पेटल्यावर मग
मरणानंतर जळलो का नाही?

जाऊदे आता दु:ख तरी
कशा कशाचं करून घ्यायचं
रडत रडत जगण्यापेक्षा
हसत हसत मरून घ्यायचं

जाळल्या ज्या कविता त्यांनी
जिवंत कविंनी केल्यावर
जिवंत केल्या त्या कविता
त्यांनी कविला जाळल्यावर

— मयुरेश कुलकर्णी

बेवड्यांना कविता ऐकवणं

August 8, 2011 1 comment

बेवड्यांना कविता ऐकवणं

हल्ली बेवड्यांनाच कविता
ऐकवणं बरं असतं
तुम्ही काय सांगाल ते
त्यांच्यासाठी खरं असतं

वास्तवाच्या चष्म्यातून जग
आपल्याला बुडवताना दिसतं
पेल्याच्या काचेतून त्यांना
सगळंच तरंगताना दिसतं

शिव्या घालत नाहीत ते
कधी तकरार करत नाहीत
चिरफाड करत नाहीत ते
कधी सत्कार करत नाहीत

हल्ली बेवड्यांनाच कविता
ऐकवणं बरं असतं
त्या एकाच पेल्यात
त्यांचं दु:ख सारं असतं

हो हो म्हणतात
ते माना पण डोलवतात
कविता संपल्यावर
परत वाचायलाही लावतात

बेवड्यांना निदान माझ्या
कविता ऐकण्याची हिम्मत असते
वेदनेत रंगून, मैफिल रंगवून
त्यांना दु:खाची किम्मत असते

सवईंचं काय आहे, त्या
लागता लागता लागतात
मग तेही आमच्यासारखे
वेड्यासारखे वागतात

फरक इतकाच की, दारू
मेंदूवर नशा चढवते
आणि कविता तीच झींग
शाईतून कागदावर उतरवते

— मयुरेश कुलकर्णी

चारोळी

चारोळी

सजलेले सुबक सगळे
कोणीच सुंदर नाही
घाबरत जगणारे सगळे
एकही कलंदर नाही

जगणं काय असतं
हे कोणी सांगतच नव्हतं
कोणाचीच चूक नाही
कोणी जगतच नव्हतं

एक चित्र असं तुझं
मला हवं आहे
कितीही बघितलं तरी
जे तसच नवं आहे

काहींचं शेवटी काम नाही
तर फक्त श्वास संपतील
काहींचे, काही न केल्याचे
‘जीवन’ हे वनवास संपतील

अंताचे संकेत आले तरी मी
थांबायचे विचार करत नाही
स्वत:चेच हात बांधून असं मी
स्वत:लाच लाचार करत नाही

काहींचे आवाज कर्कश्य, तर
काहींच्या प्राणात संगीत होते
काही कुरूप चेहेरे सुंदर, तर
काहींचे मुखवटे रंगीत होते

हल्ली चार ओळींच्या पुढे
माझी कविता जात नाही
हल्ली चार क्षणांनंतर
विचारही साथ देत नाही

लोक काट्यांना घाबरताना
फुलांचे घाव खोल होते
लोक खोटं सुख मिरवताना
माझे दु:ख अनमोल होते

— मयुरेश कुलकर्णी

चारोळी

चारोळी

असं जाता जाता तुझं
मला परत वळून बघणं
तुला जाताना बघून
तुझी वाट बघत जगणं

जाणाऱ्याने जाता जाता
पाठी वळून हसू नये
हसत हसत जाता जाता
जीव घेऊन जाऊ नये

तू गेल्यावर वाट बघत
मी जगायला लागलो
तू वळून बघण्यावरही
कविता करायला लागलो

मला ठाऊक नाही माझं
तुझ्याबरोबर काय काय येतं
इतकंच ठाऊक मला की
तू जाताना सगळंच जातं

येताना समोर बघतेस
जाताना वळून बघतेस
परत यायचं असतं तरी
मला थोडंसं छळून बघतेस

प्रेमात पडल्यावर सगळेच
शहाणे वेड्यासारखं वागतात
खरे वेडे प्रेमात न पडल्यामुळे
स्वत:ला शहाणं म्हणू लागतात

खरच प्राण जाताना
तुझं वळून बघणं आठवेल
दोघात फारसा फरक नाही
हे तेव्हाच खरं जाणवेल

आठवणीत येऊन कोणीही
कोणाला रात्री जागवू नये
प्रेमात वेडेपणा केल्यामुळे
जगाने कोणावरही रागवू नये

— मयुरेश कुलकर्णी