Archive

Archive for the ‘Suresh Bhat | सुरेश भट’ Category

अमरावतीतला एक मुलगा

April 15, 2011 1 comment

अमरावतीतला एक मुलगा

७९ वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी, अमरावती येथे एका डॉक्टरला एक मुलगा झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्या मुलाला पोलीयो झाला. या अजारामुळे उजवा पाय पांगळा होऊ लागला आणि पांगळ्या समाजाने ही वेदना वाढवली. पुढे १९५५ साली, दोन वेळा फेल झाल्यानंतर तो मुलगा बी.ए. पास झाला. समाजाने त्या मुलाला सुखाचं औषध कधी मिळू दिलं नाही, पण त्या मुलाने दु:खालाही हसायला शिकवलं.

अमरावतीच्या गावांत मराठी शिकवताना, कविता करू लागले. कविता आणि गझल हा विषय काढला की या ‘मुलाला’ साधा मुगला म्हणता येणार नाही. त्यांना प्रेमाने आणि आदराने ‘गझल समराट’ म्हणतात. त्या मुलाचं नाव होतं सुरेश भट पण आम्ही त्यांना आदराने ‘भट साहेब’ म्हणतो. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंजावात, सप्तरंग हे त्यांचे काव्य संग्रह. आपल्याला आवडणारी कित्येक गाणी त्यांनी लिहिली आहेत. अमरावतीच्या त्या पांगळ्या पायाच्या मुलाने कित्येक लोकांना त्यांच्या पायावर उभं राहायला आणि चालायला शिकवलय. त्यांना महाराष्ट्राकडून कितीही पुरस्कार मिळाले, तरी महाराष्ट्र त्यांच्या गझलांची परतफेड नाही करू शकत.

काही लोकं म्हणतात की ते १४ मार्च २००३ या दिवशी हे जग सोडून गेले, पण ते अजूनही त्यांच्या शब्दात आणि आमच्या हृदयात जिवंत आहेत. कदाचित देवाला त्यांच्याकडून त्यांची गझल ऐकायची ईच्छा झाली असावी म्हणून त्यांना बोलावलं गेलं.

(अजून भरपूर लिहू शकतो मी या शब्दांच्या राज्याबद्दल, पण माझे शब्द त्यांच्या इतके प्रभावी नसतील. आणि त्यांची खरी ओळख त्यांचे शब्द करून देतीलच.)

त्यांच्या काही ओळी –

“जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…”

“ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे

अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही”

“एकेक युध्द माझे मी हारलो तरीही

मजला अजिंक्य केले माझ्या पराभवांनी”

तुम्हाला आवडणाऱ्या ओळी तुम्ही comment म्हणून टाकू शकता. अजून भरपूर अर्थ आणि सुंदर ओळी सापडतील.

यार हो

यार हो

सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो

हे नवे फक्त आले पहारेकरी
कैदखाना नवा कोठला यार हो

ते सुखासीन संताप गेले कुठे
हाय, जो तो मुका बैसला यार हो

चालण्याची नको एवढी कौतुके
थांबणेही अघोरी कला यार हो

जे न बोलायचे तेच मी बोलतो
मीच माणूस नाही भला यार हो

सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी
जीवनाची टळेना बला यार हो

हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी?
हुंदकाही नसे आपला यार हो

ओळखीचा निघे रोज मारेकरी
ओळखीचाच धोका मला यार हो

लोक रस्त्यावरी यावया लागले
दूर नाही अता फैसला यार हो

आज घालू नका हार माझ्या गळा
(मी कुणाचा गळा कापला यार हो)

– एल्गार, सुरेश भट

बरे नाही, सुरेश भट

February 21, 2011 1 comment

बरे नाही

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही

ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही

आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही

कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही

मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…

– एल्गार, सुरेश भट

हा असा चंद्र, सुरेश भट

February 7, 2011 3 comments

हा असा चंद्र

हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी

तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

 

चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती,

राहिले कोण आता सांग झुरायासाठी !

 

कालचे तेच फ़िके रंग नकोसे झाले

दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी !

 

आडवी एक तिथे भिंत मनाची आली

दार होतेच कुथे आत शिरायासाठी !

 

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू

ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी !

 

काय आगीत कधी आग जळाली होती?

लोक नेतील मला खोल पुरायासाठी!

 

– सुरेश भट

आम्ही, सुरेश भट

आम्ही!

जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही

फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही

तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही

कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही

दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही

जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…

– एल्गार, सुरेश भट

एल्गार, सुरेश भट

January 26, 2011 3 comments

मी परत सुरेश भटांचं पुस्तक उचललं आणि परत तसाच वेडा झालो. मला त्यांच्या कविता आणि गझल फार आवडतात. तुम्हाला पण त्यांचे शब्द माहिती असतीलच, पण माझ्या ब्लॉगवर (मुड आला की) मी त्यांच्या गझल पोस्ट करत राहीन. आशा आहे की मला जितक्या आवडतात, तितक्याच त्या तुम्हाला पण आवडतील.

सुरूवात एल्गार पासून करूया…

एल्गार

अद्यापही सुर्‍याला माझा सराव नाही
अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही

येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्याभल्यांच्या हातात डाव नाही

हे दु:ख राजवर्खी .. ते दु:ख मोरपंखी..
जे जन्मजात दु:खी त्यांचा निभाव नाही

त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली
त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही

जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती
(गावात सज्जनांच्या आता तणाव नाही)

झाले फरार कुठे संतप्त राजबिंडे
कोठेच आसवांचा बाका बनाव नाही

गर्दित गारद्यान्च्या सामील रामशास्त्री
मेल्याविन मढ्याला आता उपाव नाही

जावे कुण्या ठिकाणी उद्वस्त पापियांनी?
( संतांतही घराच्या राखेस भाव नाही )

उचारणार नाही कोणीच शापवाणी…
तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे…
हा थोर गाडुंळाचा भोंदू जमाव नाही !

ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे
अन् ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही

– एल्गार, सुरेश भट