Archive

Archive for November, 2010

चमत्कार

November 25, 2010 1 comment

चमत्कार

मागितल्यापेक्षा जास्त मिळाल्यावर
कसं घ्यावं ते कळत नाही
आभार मानायला ‘धन्यवाद’ सोडून
दुसरा शब्द पण मिळत नाही

मग वाटतं मिळालेलं नकारून
देणाऱ्याचा अपमान करायला नको
आणि फक्त ‘धन्यवाद’ म्हणून
सगळंच स्वत:साठी घ्यायला नको

पुरेसं घेतल्यावर आपण
दुसऱ्यांना दिलं पाहिजे
नुसतं ‘धन्यवाद’ नको, खरंच
काहीतरी चांगलं केलं पाहिजे

काहीच दिलं नाही तरी
निदान एक स्वप्न द्यावं
चमत्काराची शक्यता वाढवून
स्वप्न खरं होताना बघावं

स्वप्न बघितलीच नाहीत
तर ती पूर्ण होणारच नाहीत
चमत्कारांवर विश्वास नसेल
तर ते घडले तरी कळणार नाहीत

— मयुरेश कुलकर्णी

‘शोध मनाचा’ प्रकाशन सोहोळा

November 21, 2010 2 comments
Shodh Manacha
प्रिय वाचकहो,

माझा पहिला काव्यसंग्रह, ‘शोध मनाचा’ प्रकाशित करताना मला आनंद होत आहे. वडील धाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने आणि विद्यादेवतेच्या वरद हस्ताने, मी हे धाडस करत आहे. तुम्ही सर्वांनी इंटरनेटच्या माध्यमातून मला खूप प्रोत्साहन दिले आणि त्याची परिणीती आज या प्रकाशनात होत आहे.

डॉक्टर पद्मजा फेणाणी यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. त्यांचे मनापासून आभार.
प्रकाशन सोहोळा दिनांक २५ डिसेंबर २०१० रोजी, संध्याकाळी ५:३० वाजता पुणे येथे होणार आहे.

आपण आलात तर मला फार आनंद होईल. (येणार असाल तर कृपया मला mayuresh87@gmail.com या पत्त्यावर कळवा.)

आपला उदयोन्मुख कवी,
मयुरेश कुलकर्णी

प्रकाशन सोहोळ्याचा पत्ता:
Indian Medical Association, Pune Branch
Dr.Nitu Mandke IMA House,
992,Shukrawar Peth,
Pune 411002.

पुस्तकाचे मुखपृष्ठ – https://mayureshkulkarni.wordpress.com/wp-content/uploads/2010/11/mk-cover.jpg

माझा बॉग – https://mayureshkulkarni.wordpress.com/

Dear Friends,
I am publishing my first collection of poems on the 25th of December 2010 in Pune. The function will begin at 5:30pm (address given below). Dr. Padmaja Phenani has written a beautiful foreword to the book.

I would like to thank you for reading and appreciating my poems online. I will be honoured if you come to the book launch and share this special occasion with me.
(Please confirm if you can attend the function by emailing me on mayuresh87@gmail.com)

Thank you
Mayuresh Kulkarni

Address :
Indian Medical Association, Pune Branch
Dr.Nitu Mandke IMA House,
992,Shukrawar Peth,
Pune 411002.

Cover Page of the book – https://mayureshkulkarni.wordpress.com/wp-content/uploads/2010/11/mk-cover.jpg

My blog – https://mayureshkulkarni.wordpress.com/

शोध मनाचा

November 19, 2010 1 comment

The cover of ‘Shodh Manacha’, my book of Marathi poems, releasing in December 2010. Click on the image to make it bigger.

Thanks for your support.

Mayuresh

Shodh Manacha

 

अजून …. अजून

November 9, 2010 3 comments

समन्वय दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला एक लेख.

लेखिका – दीपा कुलकर्णी

अजून …. अजून


फ़ार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक शेतकरी होता. त्याने एकदा एका राजाचा जीव वाचवला म्हणून राजाने त्याला बक्षीस द्यायचे ठरवले. राजाने त्याला सांगितले सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू जेवढा चालशील तेवढी जमीन तुझी. शेतकरी खूष झाला. तो सकाळी सूर्योदयापूर्वी उठून तयार झाला. बायको म्हणाली भाकरी बांधून देते. तर म्हणाला नको वेळ वाया जाईल. त्याने विचार केला चालण्याऐवजी जर आपण पळत गेलो तर अजून जास्त जमीन मिळेल. त्याने पळायला सुरवात केली. मध्ये विहीर लागली , तहान लागली असूनही तो पाणी प्यायला थांबला नाही. तसाच पळत राहिला. थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी मदाऱ्याचा खेळ चालू होता. सगळे जण बघून टाळ्या वाजवत होते. त्याने तिकडेही लक्ष दिलं नाही. तो नुसता पळत राहिला. सूर्यास्त झाला आणि तो थांबला पण अतिश्रमाने त्याने तिथेच प्राण सोडला. आता त्याच्या मालकीची प्रचंड जमीन होती. पण त्याचं प्रेत पुरायला जमीनीचा एक छोटासा तुकडाही पुरेसा होता.गोष्ट फ़ार वर्षांपूर्वीची आहे. पण अजूनही तितकीच लागू आहे. कारण आता सगळेच पळतायत. कुणी अजून पैशासाठी, कुणी सत्तेसाठी, पालक प्रवेशासाठी, विद्यार्थी मार्कांसाठी…..दमछाक चालू आहे. पळता पळता धाप लागली म्हणून जर थांबलात तर “का  पळताय” हा प्रश्न जरूर विचारून पाहा. प्रत्येकाला उत्तर मिळेलच असं नाही. उत्तर मिळालं तर चांगलच आहे पण उत्तर जर मिळत नसेल तर मात्र ते मिळवण्याची धडपड करणं गरजेचं आहे. तो सायन्सला गेला म्हणून मी पण जाणार. आपल्या घरी सगळेच डॉक्टर आहेत तुला पण व्हायला हवं. तिने तो नवीन मोबाईल घेतलाय. Lee ची जीन्स किती कूल दिसते ना…… अशी एक ना अनेक प्रलोभनं आपल्यासमोर उभी असतात. पण ह्या सगळ्यात मला काय हवय , काय करायचय, काय छान दिसेल ह्याची चौकशी कोणी करतच नाहीये. ह्या सगळ्या प्रलोभनांच्या गराड्यात रोजच्या आयुष्यात येणारे छोटे छोटे आनंदाचे क्षण कुठे हरवून गेलेत. खरतर करायचं म्हंटलं तर ह्या जगात खूप काही आहे. नुसती मराठी भाषेतली पुस्तकं वाचायची म्हंट्ली आणि रोज एक पुस्तक वाचलं तरीही आख्खं आयुष्य कमी पडेल. कुठलीही कला जोपासावी ती तुम्हाला निर्मीतीचा आनंद देईल. मग ती चित्रकला असो , नाच , गाणं, वाद्य, किंवा अगदी काडेपेटीचे छाप जमवणं असो. ह्या सगळ्या गोष्टी करण्यामधे एक झपाटलेपण असतं. तहान भूक हरपून एखाद्या गोष्टीच्या मागे लागण्यात मिळणारी नशा वेगळीच आहे. एकदा ती अनुभवून बघा. कुठल्याही रेव्ह पार्टीची गरज राहणार नाही. कधी तुमच्या कॉलेजची पुरुषोत्तमची टीम बघितली आहेत? जरूर बघून या.नाटकात बुडालेली ही मंडळी नक्की तुम्हाला जगण्याचं टॉनिक देऊन जातील.परवा सोसायटीमधे एक छोटा मुलगा फ़ुरंगटून बसला होता. काय झालं तर त्याच्या खेळातल्या कारचा रिमोट खराब झाला होता. आणि आता त्याच्याकडे काहीच खेळायला नव्हतं. त्याला खूप बोअर होत होतं. वयाच्या पाचव्या वर्षी बोअर होतंय हा शब्द तोंडात असेल तर पुढे पूर्ण आयुष्यात कसं होणार. वयाच्या दोन वर्षापासून शाळा, त्यांच्या परीक्षा, मग कोण पुढे कोण मागे ही स्पर्धा. कशासाठी??? अजून चांगली शाळा, त्याच्यासाठी अजून डोनेशन. ह्या सगळ्या “अजून अजून” मुळे जीवनात येणारा ताण वाढत चाललाय. एकदा का त्या यंत्रात पोरांना टाकलं की रेडीमेड इंजिनियर, डॉक्टर बाहेर येतात. यंत्रवत … यंत्रमानव. पण ह्या चक्रातून सहीसलामत बाहेर पडणारे मोजकेच. भरडले जाणारेच अधिक. कारण प्रत्येकाची पात्रता , आवड, नैसर्गिक कल न बघता त्यांना ह्या सगळ्यात ढकललं जातं आणि मग उरतो फ़क्त आटापिटा, नुसतं निभावत राहण्याचा. काय करायचय , हे माहीत नसताना नुसतच मेंढरांसारखं पळत राहिलात तर हाती काहीच लागणार नाही.परीक्षांच्या निकालाच्या बरोबरीने येणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या वाचल्या की जाणवतं किती अवास्तव अपेक्षा ठेवल्या जात आहेत. शाळांसाठी भरलेली गलेलठ्ठ फ़ी, क्लासेस ह्या सगळ्यातून पालकांच्या अपेक्षा तयार होतात आणि त्या मुलांवर लादल्या जातात. त्यामुळे पालकांनाच सांगावसं वाटतं थोडं थांबा. शाळा डोनेशन मागत असेल तर नाही म्हणायला शिका. आपल्या मुलाचा कल कुठे आहे ? त्याची बौद्धिक कुवत किती आहे? त्याला काय झेपेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून क्षेत्र ठरवा. कदाचित कधी कधी मार्ग नाही सापडणार पहिल्या झटक्यात. पण खचून जाऊ नका. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य काहीतरी वैशिष्ट्य घेऊन जन्माला येतो असं म्हणतात. तुमच्यातलं ते विशेष काहीतरी शोधून तर बघा. हे सगळं शोधून मार्ग चालू लागलो तरी कधी कधी अपयशाचे क्षण येतात. शक्य असेल ते सगळं करूनही यश हाती लागत नाही. पण निराश होऊन खचून जाणं योग्य नसतं. हे सगळं सोसण्याचं बळही हवं. अपयशातून उठून परत धडपड करण्याचं साहसही हवं. तुम्ही हरलात तर ते तात्कालिक असतं पण प्रयत्न करायचच सोडून दिलंत तर मात्र तुमच्या अपयशावर तुम्हीच शिक्कामोर्तब करत आहात हे नक्की. आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर प्रत्येक जण अपयशाला समोरं जात असतं. पूर्णपणे यशस्वी असं ह्या जगात कुणीच नाही. अशीही कित्येक उदाहरणं आहेत की शालेय परीक्षांमधे अपयशी झालेले नंतर मोठे उद्योगपती झाले. तेव्हा क्षणिक अपयशांना तुमचं भविष्य मांडण्याची संधी देऊ नका. आत्ता प्रचंड महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी नंतरच्या आयुष्यात नगण्य वाटतात. एखाद्या यशस्वी उद्योजकाला कोणीही जाऊन असं विचारत नाही की तुमचे दहावीचे मार्क किती? There is always a next chance. तेव्हा मस्त जगा. आयुष्य सुंदर आहेच ते अजून सुंदर बनवा. जाता जाता ह्या काही ओळी तुमच्यासाठी.

 

There was a day, when I felt low

I looked up at the stars, found no glow

The nights were dark, & nothing was right

Still a voice kept calling “ Hold on Tight”

I walked on the path & followed the light

Today … the sky is blue & the day is bright

I look at the scars and give them a smile

Lets catch up once again, its been a while.

 

दीपा कुलकर्णी मिट्टीमनी.

 

अजून चारोळ्या

November 9, 2010 2 comments
अजून चारोळ्या 

ग्रंथांसाठी लिहितो न मी,
न पुस्तकांसाठी लिहितो
माझ्या मनातलं मी
तुमच्या मनासाठी लिहितो

देव नसण्यावरतरी नास्तिकाचा
पूर्णपणे विश्वास असतो
कशावरच श्रध्दा नसली की, तो
आत्म्याचा शेवटचा श्वास असतो

मधासाठी पाखरू जसं
फुलाकडे प्रेमाने जातं
तसं माझं मन रोज
तुझ्या मनाकडे येतं

काही लोकं बोलायला लागली
की शांत बसावसं वाटतं
पण आपण शांत झालो की
लोकांना अजून बोलावसं वाटतं

सर्वात विनयशील कोण?
याचा शोध लागणार होता
म्हणून दुसऱ्यांना ढकलून
जो तो पुढे येणार होता

— मयुरेश कुलकर्णी

‘मनोगत दीपावली २०१०’ दिवाळी अंक

 

 

माझी ‘स्वतंत्र साखळ्या’ ही कविता ‘मनोगत दीपावली २०१०’ या दिवाळी अंकात वाचा

http://www.manogat.com/diwali/2010/node/6.html

‘मनोगत दीपावली २०१०’ दिवाळी अंक — http://www.manogat.com/diwali/2010/index.html

— धन्यवाद मनोगत! (मयुरेश)

 

काही चारोळ्या

November 5, 2010 1 comment

काही चारोळ्या

आज लिहून टाक सारं
उद्या बोलू नकोसच काही
परवा रहा उभा असा की
काल जणू पडलासच नाही

हातातून निसटले हात तेव्हा
मी हात माझ्याकडेच ठेवले
परत निसटलेले जवळ आले तरी
माझे हात माझ्याकडेच राहिले

डोळे बंद केल्यावरही जेव्हा
तिचा चेहरा दिसाया लागला
माझ्या लेखणीतला जीव ही
मग तिच्याजवळ बसाया लागला

मी एकटेच चांदणे बघताना
तुझे डोळे त्यात शोधत होतो
तुझ्या डोळ्यात बघताना मी
माझे चांदणे जगत होतो

आधी त्यांना पाहिजे तशी
नदी बिलकूल वळेना
मग अचानक ती सुकली का
ते कोणालाच कळेना

आज रिकामे पोट रडल्यावर
मिळणारी दयेची भिक आहे
म्हणून स्वाभिमानी भिकारी म्हणे
मी उपाशीच ठीक आहे

माझे शब्द न वाचता त्यांनी
माझ्यावर आरोप लावले होते
मी दूरूनच नमस्कार करून
त्यांचे निरोप घेतले होतो

— मयुरेश कुलकर्णी

शब्दांकित प्रतिभा

शब्दांकित प्रतिभा या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ‘मी काहीच केलं नाही’ ही कविता (online वाचा : ebook | Page 62 )

— शब्दांकित प्रतिभा website | blog

जळलेली पाठ

जळलेली पाठ

ओठांवरती हास्य होतं आज
जळलेल्या पाठीवर झोपताना
देवाला पाहिलेलं मी आज
माझं नशिब घडवताना

पाहिलेलं म्हणण्यापेक्षा
देवाचं असणं जाणवलं मला
माझ्या त्याच्यावरच्या विश्वासात
त्याचं जगणं जाणवलं मला

पाठीला आग लावणारे चेहरे
ओळखीचे होते म्हणून त्रास झाला
मग बाकीच्यांच्या शांततेने
एकटं पडल्याचा भास झाला

तक्रार करायची सवय
पाठीबरोबर जळून गेली
देव पाहिला मी आणि
एकटेपणाची भावना पळून गेली

माझं हास्य आणि जळलेली पाठ
मी आज सगळ्यांना दाखवत आहे
मला कसली भिती नाही
देव माझ्या बाजूने चालत आहे

— मयुरेश कुलकर्णी

संध्याकाळ

November 1, 2010 1 comment

संध्याकाळ

चल जाऊयात रे तिकडे
जिकडे कुणीच नाही
या अनोळख्या गर्दीची
सवय मला मुळीच नाही

चालतो सूर्य रोजच
त्याची अस्ताची चाल
तरी प्रतिक्षेत त्याच्या
संध्या होते लाजून लाल

कसे एकटे असून सारे
एकटे काहीच नाही

जो वाजवितो बासरी
त्याच्या संगितात ही गोडी
तालावर त्याच्या नाचते
समुद्र लाटांवर ती होडी

कसे निशब्द असून सारे
अबोल काहीच नाही

तेजोमय करून जगाला,
दिवसाचा निरोप घेतो रवी
शब्दांचे मागणे मागत उभा,
समुद्र किनाऱ्यावर हा कवी

आज लिहिण्यासारखे
माझ्याकडे काहीच नाही
माझे नसून काही
परके मला ते नाही

— मयुरेश कुलकर्णी