Archive

Archive for February, 2011

अजून चांगल्या गोष्टी

February 26, 2011 1 comment

अजून चांगल्या गोष्टी

काही दिवसांपूर्वी मी ‘आजची चांगली गोष्ट’ हा लेख लिहिला होता. छोट्या दु:खांपेक्षा छोट्या सुखांकडे लक्ष देऊन रोजच्या जीवनात आनंदी कसं राहावं हे समजवायचा प्रयत्न केला होता मी. भरपुर लोकांना तो आवडला, काहींनी मला त्यांच्या जीवनातील चांगल्या गोष्टी पण सांगितल्या. मला असं वाटतं की अजून लोकांनी जर त्यांचे अनुभव मांडले आणि चांगल्या गोष्टी सांगितल्या तर आपल्या सगळ्यांनाच ही सवय लागेल. मी मला आवडणाऱ्या किंवा मला आनंदीत करणाऱ्या काही गोष्टी इथे मांडतो. [लेख : आजची चांगली गोष्ट – http://wp.me/pVzyA-9w]

खिशात किंवा एखाद्या जुन्या बॅगच्या कोपऱ्यात काहीतरी शोधताना पैसे सापडले की मस्त वाटतं. म्हणजे कुठेही पैसे सापडले की बरं वाटतं पण जर ते रस्त्यात पडलेले सापडले तर घ्यायला थोडं वाईट वाटतं. पण खिशात किंवा बॅग मध्ये सापडले तर नक्की आपलेच असतील असं वाटतं आणि मग आनंद होतो. कितीही कमी पैसे असले तरी तितकाच आनंद होतो.

अजून एक छोटा आनंद म्हणजे सकाळी सकाळी बेकरीचा वास. आपल्या घराजवळ बेकरी असेल किंवा आपण बेकरी जवळून कुठेतरी जात असलो तर सकाळी ब्रेड करण्याचा वास मस्त वाटतो. सकाळच्या वेळी आपल्याला प्रसन्न वाटत असतं आणि हा बेकरीचा वास आपल्याला अजून ताजंतवानं करून जातो.

बाथरूममध्ये असताना गाणं ही पण एक मजेशीर गोष्ट आहे. सहसा मला (आणि आपल्यातल्या बऱ्याच लोकांना) लोकं काहीही गायला सांगत नाहीत, कारण मी गायला लागलो तर एकतर असं दुर कुठेतरी कुत्रं रडतय असा भास होतो नाहीतर मी रोज रेतीने गुळण्या करतो असं वाटतं. म्हणून लोकांच्या कल्याणासाठी मी आपली ही कला फक्त बाथरूममध्ये असतानाच सादर करतो. पण तुमचं गाणं माझ्या गाण्याइतकं वाईट नसलं तरी बाथरूममध्ये गाण्यासारखं स्वातंत्र्य दुसरीकडे कुठेच नाही. या स्वातंत्र्यातून एक वेगळ्याच प्रकारचं सुख मिळतं आणि लोकांना (फारसा) त्रास पण होत नाही. म्हणून ही पण एक छोटीशी चांगली गोष्ट आहे.

— मयुरेश कुलकर्णी

आजची चांगली गोष्ट

February 21, 2011 10 comments

आजची चांगली गोष्ट

रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या नसतात त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.

असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की “माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली.” थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.

जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडे लक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की ‘आजची चांगली गोष्ट काय?’ असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी ‘आजची चांगली गोष्ट काही नाही’ आसं म्हटलं की त्या ‘काहीतरी असेल, नीट विचार कर’ असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायचो. त्या पण साध्या सोप्या गोष्टी ‘आजची चांगली गोष्ट’ म्हणून सांगायच्या.

पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण ‘आजची चांगली गोष्ट’ वाटू लागल्या. आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग ‘आजची चांगली गोष्ट’च्या ऐवजी ‘आजच्या चांगल्या गोष्टी’ अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.

तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जाताना पण ‘आत देव आहे’ या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही ‘आजची चांगली गोष्ट काय?’ या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. हा प्रश्न स्वत:ला तर विचाराच, पण आपल्या मित्रांना किंवा घरातल्या व्यक्तिंना विचारा. उत्तर कितीही शुल्लक वाटलं तरी नीट ऐका, तुमचं उत्तर पण सांगा. बघा तुम्हाला पण मस्त वाटेल आणि तुमच्या मित्रांना पण. हा प्रश्न खूप बाळबोध वाटतो, किंवा मित्र चेष्टा करतील असं वाटत असेल तर आधी काही दिवस स्वत:लाच विचारा. मग एकदा तुम्ही रोजच्या दिवसाचा आस्वाद घेऊ लागलात की मित्रांना विचारा ‘आजची चांगली गोष्ट काय?’

आता शेवटी मी मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो. खाण्यावरून सुरूवात केली तर तेलकट तरी आणि तिखट मिसळ, आईस-क्रिम, उन्हात फिरून आल्यावर उसाचा रस, पुण्यातली सुजाताची मस्तानी, पाऊस पडत असताना गरम गरम भजी, रात्री झोपायच्या आधी एक छोटं चॉकलेट, आईच्या हातचं जेवण, हापूस आंबा असे असंख्य पदार्थ आहेत. हे रोज एक एक करून खायचं असं ठरवलं तरी वर्षाच्या ‘चांगल्या गोष्टींची’ यादी होईल. रेडिओ वर अचानक लागलेलं आपल्याला आवडणारं गाणं, हे पण एक वेगळंच सुख आहे. त्यात ते गाणं थोडं जुनं असेल आणि आपल्याला त्याचा विसर पडत असताना ते लागलं तर मग अजूनच मस्त वाटतं. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा सुगंध पण हृदयात सुकलेल्या भरपूर आठवणी परत ओल्या करून जातो. आपण नवी साडी किंवा नवा शर्ट घातला की होणारी प्रशंसा हे पण एक छोटंसं सुखच आहे. अंघोळ करून स्वच्छ झाल्यावर अंगावर मारलेलं अत्तर, आपल्याला दिवसभर त्याच्या सुगंधाने ताजंतवानं ठेऊ शकतं. अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद देऊ शकतात, जर आपण त्यांना आनंद द्यायची संधी दिली तर.

(तुम्ही तुमच्या ‘रोजच्या चांगल्या गोष्टी’ किंवा छोटी सुखं इथे पोस्ट करू शकता, किंवा मला mayuresh87@gmail.com वर पाठवू शकता.)

– मयुरेश कुलकर्णी

बरे नाही, सुरेश भट

February 21, 2011 1 comment

बरे नाही

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही

जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही

ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही

जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही

आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही

कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही

मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…

– एल्गार, सुरेश भट

श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय?

February 18, 2011 3 comments

श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय?

तुम्हाला काय करायचय, श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय? मी या एका प्रश्नाच्या दोन्ही बाजू मांडणार आहे. शेवटी या प्रश्नाचं उत्तर किंवा याच्यावरचा निर्णय हे तुमच्याच हातात आहे.

आपण ‘श्रीमंत मरायची’ बाजू आधी बघुयात. ‘श्रीमंत मरायचं’ या विचाराची सुरुवात माझ्या डोक्यात एका घटनेमुळे झाली. मी माझ्या चुलत बहिणीशी बोलत असताना, तिने मला सांगितले की त्यांच्या ऑफिसातला एक मुलाचे हार्ट ऍटॅकने निधन झाले. त्याचे वय २४ ते २५ वर्ष होते. मला धक्का बसला. इतक्या लहान वयात हार्ट ऍटॅक? आणि काही पूर्व कल्पना किंवा आजार नसताना? मी पुढे ऐकू लागलो. तो मुलगा खूप हुशार होता. सी. ए. आणि सी. एस. शिकलेला, सी.ए. ला रॅंक होल्डर होता. शिक्षणानंतर चांगली नोकरी, चांगला पगार मिळाला. हे सगळं ऐकताना मी त्या हार्ट ऍटॅकचे कारण शोधत होतो. ते मला लवकरच मिळाले. चांगल्या पगाराबरोबर येणारा कामाचा भार आणि त्यामुळे मनाला होणारा त्रास. काम करत असल्याने तो सतत ऑफिसात असायचा. त्याचं चित्र माळ्या डोळ्यासमोर लगेच उभं राहिलं. सकाळी झोप पूर्ण झाली नसेल तरी उठायचं, लवकरात लवकर तयार होऊन ऑफिसला जायचं आणि रात्री किंवा मध्य-रात्री परत घरी येऊन झोपायचं. आई-वडिलांबरोबर राहात असेल तर घरचं जेवण तरी मिळेल नाहीतर रोज बाहेरचं खायचं. रोज हे केल्यावर, शनिवारी सुट्टी असलीतरी ऑफिसात जाऊन काम करायचं, किंवा ऑफिसमधलं काम घरी आणून करायचं. रविवारी काम नसेल तर आठवडाभर न झालेली झोप भरून काढायची, किंवा मित्रांबरोबर रात्री उशीरापर्यंत बाहेर फिरायला जायचं. म्हणजे परत विश्रांती नाही, आणि रविवार गेला की परत सोमवारी ऑफिस, ऑफिस आणि परत ऑफिस. ऑफिस सोडून दुसरं काही केलं नाही तर कामाचा ताण जाईल कसा? हे असं चित्र कितीतरी लोकांचं आहे.

आपण लहानपणापासून मुलांना नोकरीसाठी घडवतो. चित्रकलेची किंवा गाण्याची कितीही आवड असली तरी त्याला गणिताचे पाढे पाठ करायला लाऊन, पुढे इंजिनियर आणि डॉक्टर करतो. एखाद्या यंत्रासारखं शिक्षण संस्थांतून असे हजारो-लाखो इंजिनियर, डॉक्टर आणि सी.ए. वगैरे बाहेर पडत आहेत. पालकांची चूक नाही कारण ते त्यांच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठीच असं करतात. चित्रकार होऊन काय होणार? कवि झाला तरी पोट कसं भरणार? मग एम.बी.ए. झाला तर चांगली नोकरी लागेल, असेच विचार सगळे करतात. आणि यात काहीही चुकीचं नाही, हीच आजची परिस्थिती आहे. पण जर आपण आपल्या मुलांना नोकरीसाठी शिकवतो, तर नोकरी नंतर काय? आधी जो मुलगा १४-१५ तास नोकरी मिळण्यासाठी आभ्यास करत असतो, परिक्षा देत असतो, तोच मुलगा आता १४-१५ तास नोकरी टिकावी म्हणून ऑफिसमध्ये अडकून पडला असतो. ‘आपण नोकरी का करतो?’, या प्रश्नाला लगेच उत्तर मिळतं की ‘पैसे मिळावे म्हणून नोकरी करतो’. मग असा प्रश्न केला ‘आपल्याला पैसे का कमवायचे आहेत?’ तर असं उत्तर मिळतं की ‘आपल्याला कुठे काही कमी पडायला नको. आपल्याला आपल्या लोकांबरोबर पाहिजे तेवढी मजा करता आली पाहिजे म्हणून पैसा पहिजे’. जर असं उत्तर असेल तर नोकरी आपण बरोबर उलटं करतो. नकोशी झालेली कामं, नकोशा झालेल्या लोकांसाठी, आपण नको तेवढा वेळ देऊन करत असतो. शिक्षण हे आपल्याला जे पाहिजे ते करण्याचं स्वातंत्र्य देत नाही. शिक्षण आपल्याला नोकरी देतं आणि आपण रोज १४-१५ तास काम नाही केलं तर आपली नोकरी दुसऱ्याला दिली जाईल अशी भिती देतं. आणि यात कोणाचीच चूक नाही, तुम्ही कोणावरच आरोप लावू शकत नाहीत. ऑफिसात बॉसला काही बोलू शकत नाहीत कारण तो पण त्याची नोकरी वाचवण्यात गुंतलाय. तो पण याच चक्रात अडकलाय. तुम्ही काम करत असलेल्या कंपनीला काही बोलू शकत नाहीत कारण तुम्हालाच नोकरी पाहिजे होती म्हणून तुम्ही स्वत:हून त्यांच्याकडे गेलात. तुम्हाला पगार देतात म्हणूनच तुमच्याकडून काम करून घेतात, म्हणून त्यांची पण काही चूक नाही. तुमच्या पालकांना तर तुम्ही काही बोलूच शकत नाही कारण आज त्यांच्यामुळेच तुमच्याकडे शिक्षण, नोकरी आणि आर्थिक स्वातंत्र्य आहे. शेवटी काय, चूक कोणाचीच नाही पण तुम्हाला नोकरी असून, तुमच्याकडे पैसे असून तुम्हाला जे करायचय ते तुम्ही करू शकत नाहीत. म्हणूनचे जिवंत असूनही जगतोय असं वाटत नाही.

आपल्याकडे पैसे किंवा नोकरी नसताना आपल्याकडे किती स्वप्न असतात. आपल्याला कित्येक गोष्टी करायच्या असतात आणि आपण स्वत:ला सांगतो की पैसा आला की हे करायचं, शिक्षण संपल्यावर ते करायचं. वेगवेगळ्या लोकांच्या मजेच्या व्याख्या वेगळ्या आहेत आणि मजा म्हणून करण्यासारख्या पण कितीतरी गोष्टी आहेत. लोकं आवड म्हणून क्रिकेटचे सामने बघायला जातात. माझे काही मित्र तर शहरातल्या विविध हॉटेलात जाऊन त्यांना आवडणारे पदार्थ खातात आणि त्या हॉटेलांबद्दल लोकांना सांगतात. त्यांना खाण्याची इतकी आवड आहे की ते कोणत्या हॉटेलात काय चांगलं मिळतं हे पटकन सांगू शकतात. काहींना फिरायला जायची आवड असते, तर काहींना वाचनाची. काही नाचायला, गायला शिकत असतात तर काही आवड म्हणून हे सगळं शिकवत असतात. हे सगळं करण्यासाठी आवड आणि वेळ लागतो. पण जर माणूस बराचसा दिवस ऑफिसात काम करून आला तर त्याला स्वत:साठी, ही सगळी मजा करायसाठी वेळ आणि ताकद कशी मिळणार. जे लोकं म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही ते हे पण म्हणतात की ते रिटायर झाल्यावर मजा करतील. पण इतकी वर्ष रोज १५ तास ऑफिसचं तोंड बघत राहिल्यावर अचानक रिटायर झाल्यावर मजा कशी करणार. यांना मजा करायला पण हळूहळू शिकावं लागेल. तो पर्यंत कदाचित कशाची आवड बाकी राहिली नसेल. आवड नसली आणि काही करायला नसेल तर चिडचिड होते, जवळच्यांना त्रास होतो. माणूसं हसत आणि मजा करत जगायच्या ऐवजी निराश होतात. मग हे असे रिटायर झालेले देह आणि थकून गेलेली मनं जेव्हा ही धरती सोडून जातील तेव्हा त्यांच्या बॅंकेच्या खात्यात भरपूर काही असेलही, पण मजा करण्याच्या खात्यात काहीच नसेल. ही झाली श्रीमंत मरायची बाजू. आता याच्या अगदी विरूध्द म्हणजे श्रीमंत जगण्याची बाजू बघुयात.

जसा श्रीमंत मरणाचा, देह आणि मन हे दोन्ही मरण्याशी संबंध होता तसाच श्रीमंत जगण्याचा पण आहे. श्रीमंत जगा, म्हणजे भरपूर खर्च करा किंवा गरज नसलेल्या गोष्टींवर पैसे खर्च करा असं मुळीच नाही. शिक्षणामुळे जसं आपल्याला आवडतं ते काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, तसं संपत्तीमुळे आपल्याला जसं जगायचं आहे तसं जगायला मिळावं हे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. म्हणूनच श्रीमंत जगायचं म्हणजे मजेत, जिवनाचा आनंद घेत आणि आपल्या जवळच्यांना आनंद देत जगावं. असं जगायला लागलं की ऑफिसच्या कामाचा ताण पण कमी होतो. असं जगण्यासाठी वेळ आणि आवड यांची गरज आहे. आवड प्रत्येकाच्या वेगळ्या असतात पण वेळ असतोच असं नाही. आपल्या कामाने भरलेल्या दिवसातून स्वत:साठी वेळ कसा काढावा हा फार मोठा विषय आहे, पण जर खरंच प्रयत्न केला तर वेळ काढता येतो. एकदा माझ्या वडिलांनी त्यांच्या मित्राला मजेतच सांगितलं होतं “मी रोज मुलं उठायच्या आधी ऑफिसला निघतो आणि रात्री मुलं झोपल्यावर घरी येतो. काही दिवसांनी माझ्याबद्दल मुलं हीला विचारतील ‘आई, ते रविवारी आपल्याकडे येतात ते ‘काका’ कोण ग?'” म्हणूनच ज्यांच्या भविष्यासाठी तुम्ही इतका वेळ ऑफिसात असता, त्यांना आज वेळ देता येईल म्हणून तरी दिवसातून थोडा वेळ काढा. कुठल्याही नात्याला किंवा मैत्रिला मजबून करायला वेळ लागतो. पैसे कमी असतानाही एक सॅंडविच मित्राबरोबर वाटून खाताना जशी मजा येते तसंच कोणत्याही नात्याबरोबर वेळ घालवला की ते पक्कं होतं. आजच्या सुसाट धावणाऱ्या जगात, आपल्यासाठी थांबून आपलं ऐकायला कोणीतरी आहे हीच कित्येकांसाठी एक खूप मोठी गोष्ट असते. एकदा वेळ काढायचा ठरवला की वेळ काढला जातो, आणि वेळ असला की काहीही मजा करता येते. माझ्या माहितीतला एक माणूस ऑफिसातून घरी आला की गाण्याचा रियाज करतो, रत्री कितीही उशीर झाला तरी. एक पती-पत्नी दर शनिवार-रविवारी कुठेतरी फिरायला जातात, मग ते ठीकाण कितीही जवळ किंवा दूर असो. काही लोकं सेवा म्हणून जवळच्या ग्रंथालयात, देवळात किंवा अशा संस्थात जाऊन श्रमदान करतात. कित्येक लोकं सिनेमा आणि नाटकं चुकवत नाहीत. एकदा वेळेचा नीट वापर करायला शिकलो तर आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टींसाठी वेळ तयार करू शकतो. शाळेत असताना, आभ्यासामुळे जर आपल्याला चित्र काढता आली नसतील तर काम करून घरी आल्यावर आपण चित्रकार बनू शकतो. मग पुढे कोणी विचारलं की तुम्ही काय करता तर सांगता येईल की “मी चित्रकार आहे आणि वेळ मिळाला की मी या कंपनीत नोकरी पण करतो.” नोकरी आपली ओळख होत नाही, ती आपलं काम होते. मग नोकरी आपलं जीवन होत नाही, ती फक्त मजा करायला मिळावी म्हणून खर्च केलेला वेळ होते. अर्थात नोकरीतही मजा करता येत नाही असं नाही. जर आपल्याला आवडणारं काम असेल तर आपण ऑफिसात पण सुखी असू शकतो. असं असेल तरी आपण स्वत:साठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तिंसाठी वेळ काढला पाहिजे. कशाचाही अतिरेक करू नये, सगळीकडे थोडी-थोडी मजा करावी. माझं स्वत:चं उदाहरण म्हणजे आम्ही तीन मित्र महिन्यातून एकदा कॉफी प्यायला भेटतो. तसं बघायला गेलं तर फार काही मजा असेल असं वाटत नाही. पण ३-४ तास कसे जातात ते कळत नाहीत. गप्पा होतात, चेष्टा-मस्करी होते आणि कॉफीच्या नादात गेलेला महिना काय घेऊन आला आणि काय घेऊन गेला याची चर्चाही होते. मित्रांबरोबर असताना गप्पांना विषय पण लागत नाहीत, आणि एक संध्याकाळ मस्त मजेत जाते. मग परत पुढचा महिनाभर अशा संध्याकाळची वाट बघितली की कामाचा किंवा आभ्यासाचा ताण जाणवत नाही.

अशा साध्या-सोप्या गोष्टीपण आपलं जगणं श्रीमंत करू शकतात. तसं बघितलं तर छोट्या-छोट्या गोष्टीतूनच मोठ्या गोष्टी होतात. जसं दररोज स्वत:ची काळजी न घेतल्याने एकदा अचानक त्या मुलाला हार्ट ऍटॅक आला, तसं रोज थोडा-थोडा वेळ काढून आपण स्वत:ला खुश केलं तर बघता बघता आठवडा मजेत जाईल, मग महिना, मग वर्ष. कामाचा भार जड वाटणार नाही, मन हलकं कसं करावं असे प्रश्नच पडणार नाहीत आणि दिवसातला वेळ कधी कमी पडणार नाही. एका मित्राकडून मी एक सुंदर विचार ऐकला होता की पैसा खिशात असावा पण तो डोक्यात जायला लागला की माणूस बिघडतो. म्हणजे पैसा खिशात आणायचा जसा प्रयत्न केला पहिजे तसच तो डोक्यात जाता कामा नये याची पण काळजी आपण घेतली पाहिजे. श्रीमंत जगायचं म्हणजे नुसतच श्रीमंत बनायचं असं नाही तर मजेत, सुखात जगायचं. अशाने आपल्या जवळची लोकं पण आनंदी होतात, आपण नव्या-नव्या गोष्टी शिकतो, आपल्याला पहिजे ते करतो आणि बॅंकेच्या खात्यात किती आहेत आणि किती असले पाहिजेत याची जास्त चिंता करत नाहीत. आता परत सुरूवातीला विचारलेला प्रश्न. तुम्हाला काय करायचय, श्रीमंत जगायचय का श्रीमंत मरायचय? मला माझं उत्तर मिळालय, तुम्हाला तुमचं उत्तर शोधायचय.

— मयुरेश कुलकर्णी

वेडे

February 17, 2011 1 comment

वेडे

हे असे वेडे शब्द
जेव्हा वाचतील वेडे
विश्वासाने त्यांच्याच वाटेवर
न घाबरता चालतील वेडे

फक्त चालणारच नाहीत
कदाचित पळतील वेडे
नशिबाचे पंख मिळाले तर
उंच उडतील वेडे

भाड्यावर आणलेली हुशारी
क्षणात  विसरतील वेडे
ते किती वेडे आहेत हे
सर्वांना सांगतील वेडे

कोण जाणे शहाण्यांना
केव्हा पटतील वेडे
सदैव त्यांच्या वेडात
खुश असतील वेडे

आज हरल्यावर हसत
सुळावर चढतील वेडे
उद्या परत वेड्यासारखं
मरेपर्यंत लढतील वेडे

— मयुरेश कुलकर्णी

चुरगाळलेले कागद

February 14, 2011 1 comment

चुरगाळलेले कागद


चुरगाळलेले कागद माझ्या
टेबलावर बरेचदा वाढतात
‘आपण काय बनू शकलो असतो’
असे विषय एकामेकात काढतात

काहींना बनायचं होतं काव्य
काही झाली असती गाणी
काही हृदयातलं हास्य
तर काही डोळ्यातलं पाणी

वाटतं मी लिहू शकलो असतो
पण काही लिहीले नाही
कदाचित विचारांची मर्जी नसावी
म्हणून त्यांचे शब्द झाले नाही

पण बिचारे सगळे मिळून
माझ्या टेबलावर बसतात
अपूर्ण राहिलेली स्वप्ने ती
ते चुरगाळलेले कागद असतात

मी असे कागदाचे बोळे
काही दिवसांने फेकून देतो
परत येतीलच ती स्वप्ने
आज त्यांना मुक्त सोडून देतो

— मयुरेश कुलकर्णी

कचरावाला कोण?

February 11, 2011 3 comments

कचरावाला कोण?

रस्त्यावर चालताना मला
कचरावाला रोज दिसायचा
सगळीकडचा कचरा तो
एकटाच एकत्र करायचा

मग सगळं वर्गिकरण करून
जे विकता येईल ते विकायचा
लोकांच्या कचऱ्याच्या बळावर
स्वत:चं पोट भरायचा

उरलेलं सगळं शहरापासून
दूर नेऊन टाकायचा
जे चांगलं असेल त्याचा
स्वत:साठी वापर करायचा

लोकांनी नकारलेल्यातही
तो उपयोग शोधायचा
स्वत:च्या हुशारीने काही
परत न फेकता वापरायचा

आता त्याला ‘कचरावाला’ म्हटलं
की मला थोडासा राग येतो
कारण त्याला पाहिल्यावर, मला
सतत एकच प्रश्न पडतो

जो निरूपयोगी गोष्टींना
कचरा समजतो तो?, का
जो कचऱ्याचाही नीट
उपयोग करतो तो?
खरा ‘कचरावाला’ कोण?

— मयुरेश कुलकर्णी

लोकमतमध्ये आलेली ‘शोध मनाचा’ची बातमी

(Click on the image for full view)

हा असा चंद्र, सुरेश भट

February 7, 2011 3 comments

हा असा चंद्र

हा असा चंद्र अशी रात फ़िरायासाठी

तूच नाहीस इथे हात धरायासाठी !

 

चेहरा तो न इथे, ही न फ़ुलांची वस्ती,

राहिले कोण आता सांग झुरायासाठी !

 

कालचे तेच फ़िके रंग नकोसे झाले

दे तुझा ओठ नवा रंग भरायासाठी !

 

आडवी एक तिथे भिंत मनाची आली

दार होतेच कुथे आत शिरायासाठी !

 

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू

ये गडे आज उभा जन्म चिरायासाठी !

 

काय आगीत कधी आग जळाली होती?

लोक नेतील मला खोल पुरायासाठी!

 

– सुरेश भट

तुटलेलं थाळीपीठ

February 1, 2011 1 comment

तुटलेलं थाळीपीठ

२ वर्षांपासून मी शिल्पा मावशीला ‘तुम्ही लिहा’, ‘तुम्ही सुंदर लिहू शकता’ असं कित्येकदा म्हटलो आहे. माझ्या कविता त्या वाचतात, मस्त गप्पा मारतात पण लिहीत काहीच नाहीत. माझं असं प्रामाणिक मत आहे की त्या मस्त लिहू शकतात. अशा लेखनाची जगाला गरज आहे.

या वर्षी मी भारतात आल्यावर परत आमची भेट झाली. सगळ्याच विषयांवर गप्पा रंगत गेल्या. मी काही कविता त्यांना वाचून दाखवल्या. सगळं मस्त-मजेत चालू होतं, आणि मग थोडी गडबड झाली. मावशी मला थाळीपीठ करून वाढत होत्या. तेवढ्यात त्या म्हणाल्या ‘तुला अडकलेली कविता कशी असते माहित आहे का?’ थाळीपीठ देताना असा प्रश्न केल्यावर मला कळालं की मावशीचं थाळीपीठ तुटलं. मग अडकलेल्या कवितेसारखं ते तुटलेलं थाळीपीठ माझ्या ताटात आलं, आणि मावशी अचानक म्हणाल्या ‘तू असं म्हणतोस की तू कशावरही कविता करू शकतोस तर या तुटलेल्या थाळीपीठावर कविता करून दाखव!’

त्यावेळी मी हसत हसत तो विषय टाळला आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे (म्हणजे थाळीपीठ संपवण्याकडे) लक्ष दिलं. पण काल परत हा प्रसंग आठवला, मी परत हासायला लागलो आणि मग कविता सुचू लागली. या कवितेचं साहित्यीक मूल्य काय, किंवा ही कोणाला आवडेल का ते मला माहित नाही.पण मावशीने लिखाण सुरू करावं, या साठी तिला थोडं प्रोत्साहन द्यायला, ही कविता लिहितोय. अगदीअ आवडली नाही, तर तुटलेल्या थाळीपीठासारखी ही कविता आकार-उकाराचा जास्त विचार न करता संपवून टाकावी.

थाळीपीठ करताना कदाचित
तेल थोडं कमी पडलं
म्हणून एकत्र न होता
ते मावशीचं थाळीपीठ तुटलं

तुकड्यांची चव तीच
फक्त दिसताना वेगळं दिसतं
कधी कधी व्यक्त करण्याचं
पण या थाळीपीठासारखं असतं

मनात येईल ते
व्यक्त करावं, लिहून टाकावं
लिखाणाचं पण आपल्या
थाळीपीठ जमवून बघावं

प्रामाणिकपणा नसेल
तर चव बिघडते
विश्वास नसेल
तर आकार बिघडतो

वेदना नसेल तर
थाळीपीठं कच्ची राहातात
आणि प्रेम नसेल
तर तुकडे पडतात

कितीही तुकडे पडले
तरी थाळीपीठ चांगलं लागतं
काही कमी-जास्त झालं
तरी ते थाळीपीठ आपलं असतं

— मयुरेश कुलकर्णी