Archive

Archive for March 14, 2011

छोट्या दिसणाऱ्या मोठ्या गोष्टी

छोट्या दिसणाऱ्या मोठ्या गोष्टी

आज अचानक मी विचार करायला लागलो की चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे चहा मिळतात. एक साधा आणि एक स्पेशल. या दोघात एक-दोन रुपयांचा फरक असतो म्हणून सहसा लोकं थोडे जास्त पैसे भरून स्पेशल चहा मागवतात. ही गोष्ट खरंच खूप छोटी आहे पण आहे मजेशीर. थोडक्यात, स्वत:च्या पाकीटाला जास्त धक्का लागत नसेल तर लोकं चहा सारख्या साध्या गोष्टी पण स्पेशल घेतात. मग हाच विचार किंवा हीच छोटी गोष्ट सगळीकडे दिसू लागली. आम्ही लहान असताना एका चॉकलेट बरोबर एक स्टिकर मिळायचं म्हणून तेच चॉकलेट घ्यायचो. मग ते चॉकलेट सर्वात चांगलं किंवा सर्वात स्वस्त नसेलही, पण आम्ही त्या स्टिकरसाठी ते घ्यायचो. आणि त्या चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीलाही ही गोष्ट माहित होती. काहीतरी चांगलं किंवा आपल्याला हवं असणारं फुकट मिळतय या साठी कधीकधी आपण जास्त पैसे (कळत किंवा नकळत) खर्च करतो. आजकाल सगळीकडेच हा प्रकार दिसतो. बाजारात हे घेतलं तर ते फुकट मिळतं यावरच कितीतरी दुकानं चालतात.

या असल्या दुकानात आपण जावं का जाऊ नये, किंवा या फुकट मिळणाऱ्या गोष्टी चांगल्या की नाही ते मला माहित नाही. पण जर आपण दुकानाचा आणि बाजाराचा विचार न करता हीच गोष्ट आपल्या जीवनात वापरता येईल का ते बघितलं पाहिजे. जसं छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद मिळू शकतो, तसंच अशा छोट्या गोष्टी सांभाळल्या तर मजा येईल. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एकतर आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे. दुसरं म्हणजे मित्रांचा किंवा घरातल्या लोकांचा विचार करून आपण निस्वार्थीपणे त्यांच्यासाठी काहीतरी छोटं आणि त्यांना आनंद देणारं केलं पाहिजे. म्हणजे आनंद देणाऱ्या मोठ्या गोष्टी करू नका असं मी म्हटतच नाही, पण छोट्या गोष्टी केल्या की त्या लक्षात पण राहतात आणि त्या त्यांना आपेक्षीत पण नसतात. अशा लहान गोष्टी आपल्या जवळच्यांना हे दर्शवून देतात की आपण त्यांचा विचार करतो, त्यांच्या आवडी-निवडी माहिती करून घेऊन त्यांच्या मनासारखं करायचा प्रयत्न करतो. या सगळ्यातून त्यांच्यासाठी आपलं प्रेम आणि त्यांचं अपल्या जीवनातलं महत्व त्यांना सांगावं लागत नाही, ते त्यांना आपोआप कळतं. आणि आपण काही अपेक्षा ठेवल्या नाहीत तरी त्यांना पण आपल्यासाठी अशाच छोट्या पण आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. तुम्ही काहीतरी चांगलं केलं की ते तुमच्याकडे परत येतच.

आपण म्हणतो की वाईट गोष्टी लक्षात राहतात, पण छोट्या चांगल्या गोष्टी पण लक्षात राहतात. एक उदाहरण माझ्या लहानपणीचं. आम्ही माझ्या मामाकडे बरेचवेळा जायचो आणि मला माझा मामा खूप आवडायचा (अजूनही आवडतो). पण मला त्याची थोडी भितीपण वाटायची. माझ्याकडून चूक झाली की तो ओरडायचा आणि तो ओरडला की मला वाईट तर वाटायचंच, पण भिती पण वाटायची. मग एके दिवशी मी त्याच्याकडे गेलो असताना, त्याने मला फिरायला नेले. घरी येताना आईस-क्रिम पण दिले. मस्त गप्पा मारत आम्ही घरी आलो, भिती गेली आणि मामा अजून आवडू लागला. परत आता इतक्या वर्षांनंतर ते आईस-क्रिम एकदम छोटं वाटतं. तो कदाचित ते विसरलाही असेल. पण इतकी लहान गोष्ट माझ्या लक्षात आहे, कारण त्या एका छोट्या गोष्टीने माझं आणि माझ्या मामाचं नातं बदललं. आम्ही मित्र बनू लागलो आणि आता मोठं झाल्यावर आमचं नातं अजून चांगलं झालं. या सगळ्याचं पहिलं पाऊल म्हणजे ती एक संध्याकाळ आणि ते छोटं वाटणारं आईस-क्रिम.

अजून एक उदाहरण म्हणजे दान देणं. काही संस्था ज्या गरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी काम करतात, किंवा गावात शाळा बांधतात किंवा समाज सुधारण्यासाठी काम करतात त्या आपल्याला हेच सांगतात. तुम्हाला जमेल तेवढं दान करा, कारण कुठलंच दान लहान नसतं. मला काही वेळा असं वाटायचं की जर मी दान करायचं ठरवलं आणि माझ्याकडे देण्यासाठी फार कमी असेल तर मला लाजल्यासारखं होईल. एकतर मला लाजल्यासारखं होईल आणि घेणाऱ्याला मी त्यांचा अपमान करतोय असंही वाटू शकतं. पण आता असं वाटतं की जर चांगल्या मनाने थोडंसं काहीतरी चांगलं केली तरी ते कमी नसतं. माझ्यासारख्या भरपूर लोकांनी जर छोटं छोटं दान केलं तर सगळं मिळून ते मोठं होईल. सेतू बांधताना खारूताईने तिला जेवढं जमलं तेवढं तिने केलं.

अनोळखी माणसांना मदत करणं तर दूर राहिलं आपण आपल्या लोकांना तरी खुश करू शकतो. वाटतं तेवढं अवघड नाही हे करणं. या छोट्या दिसणाऱ्या मोठ्या गोष्टी आहेत. कधीतरी आईला किंवा बायकोला फुलं देणं, लहान मुलांना झोपण्याआधी गोष्टी सांगणं, मित्रांना त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीच्या गोष्टी देणं आणि काही नाही तर प्रत्येकाचं हसून रोज स्वागत करणं. अशा काही स्वस्त आणि छोट्या गोष्टी करून पण आपण कितीतरी बदल घडवू शकतो. फक्त आपलं मन प्रामाणिक आणि निरपेक्ष असलं पाहिजे.

— मयुरेश कुलकर्णी