Archive

Archive for March 16, 2011

गाण्याच्या स्पर्धा, चित्रकलेचे मार्क आणि चांगल्या कविता

March 16, 2011 2 comments

गाण्याच्या स्पर्धा, चित्रकलेचे मार्क आणि चांगल्या कविता

दोन अधिक दोन किती, याचं उत्तर सोपं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काल पण तेच होतं, आज पण तेच आहे आणि उद्या पण बदलणार नाही. तुमच्यासाठी पण तेच उत्तर आहे जे माझ्यासाठी आहे, हे पण नाही बदलत. पण जर मी तुम्हाला असं विचारलं की तुम्हाला कसं, कुठलं किंवा कोणाचं गाणं आवडतं तर तुम्ही काय उत्तर द्याल? उत्तरं प्रत्येका व्यक्तिची वेगवेगळी असतील आणि एकाच व्यक्तिला वेगवेगळी गाणी पण आवडू शकतील. मुख्य म्हणजे कला ही कला आहे म्हणून कुठल्याही कलेची स्पर्धा झाली की मला ते खटकतं. गाण्याच्या स्पर्धा हे पटत नाही. तुम्हाला दहा वेगवेगळी फुलं फुलताना दाखवली तर तुम्ही सांगू शकाल का की कुठचं जास्त चांगलं फुलतं. तसंच गाणं हे भावता व्यक्त करण्याचा प्रकार आहे, चांगलं वाईट हे ऐकणाऱ्यावर आहे. एका ऐकणाऱ्याने गाणं वाईट म्हटलं म्हणून ते गाणं वाईट होत नाही, त्याचा अर्थ एवढाच होतो की ते गाणं त्याला आवडलं नाही. म्हणून गाण्याच्या स्पर्धा करून लोकांची मनं दुखवणं योग्य वाटत नाही.

जसं गाण्याचं तसंच चित्रकलेचं. शाळेत किंवा इतर ठिकाणी चित्राला मार्क देऊन आपण कितीतरी चांगले चित्रकार घालवले असतील. खरंतर वेगवेगळ्या चित्रांना ३,४, किंवा ७,८ मार्क कसे देऊ शकतात ते मला कळत नाही. या चित्राला ३ आणि त्याला ४ मार्क का दिले असं तपासणाऱ्यांना विचारलं तर ते काय उत्तर देतील काय माहिती. कितीतरी चांगल्या चित्रकारांचा आत्मविश्वास अशा मार्कांमुळे गेला असेल. परत असंच म्हणावसं वाटतं की एका शिक्षकाला आवडलं नाही, म्हणजे ते चित्र वाईट होत नाही. त्याचा अर्थ असाच होतो की त्या शिक्षकाला ते चित्र त्या दिवशी तेवढंच आवडलं. कदाचित अजून काही शिक्षकांना दाखवलं तर ते वेगळे मार्क देतील किंवा त्याच शिक्षकाला काही वर्षांनी ते चित्र दाखवलं तर आवडेलही. मार्कांवर कलेची लायकी ठरवणं हेच मुळात पटत नाही आणि त्याहून पटत नाही म्हणजे दोन कलाकारांची स्पर्धा.

कला ही मनातलं व्यक्त करण्यासाठी असते. मग ते गाणं असो किंवा चित्र. कितीतरी वेळा असंही होतं की कलाकाराला विचारलं की तू हे असं का केलंस, तर तो सांगू शकत नाही. कारण कलेला काही अर्थ असतोच असे नाही, किंवा अर्थ बदलतोही. पण मुख्य म्हणजे कलाकार हा त्याच्या पाहिजे ते त्याला पाहिजे तसं करत असतो, आणि त्याला आनंद मिळत असतो म्हणून करत असतो. त्याचे मन नाजूक असते, तो कुठेतरी या जगात त्याची जागा शोधत असतो. त्याचे व्यक्त केलेले विचार कोणाला पटतात का किंवा आवडतात का हे बघत असतो. त्याचा हा शोध सुरू असताना कुणी जर त्याच्या कलेला नावं ठेवली किंवा असे मार्क दिले तर तो चिडतो. त्याचा आत्मविश्वास खचतो आणि तो व्यक्त करायचं सडतो. त्याला जे आवडतं ते करायचं सोडून दिल्याचा त्याला त्रास होतो. म्हणूनच कला ही कला आहे, तिला गणितासारखी सरळ उत्तरं नाहीत.

यावरच आधारीत एक प्रश्न म्हणजे, चांगली कविता काय असते? गेले ६-७ वर्ष मी कविता करतो मला अजून या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आणि मला या प्रश्नाचं उत्तर नको आहे. चांगली कविता काय असते हे मला माहित नाही पण मला जे वाटतं ते प्रामाणिकपणे व्यक्त करणं हीच माझी कविता आहे. कवितांना मार्क देण्यापेक्षा त्यांचे अर्थ कसे बदलतात, किंवा लोकांचे विचार काय आहेत हेच जास्त महत्वाच असतं. आणि मला या प्रश्नाचं उत्तर नकोय कारण जर ते उत्तर मिळालं तर मी गणितात सुत्र वापरतात तसं सुत्र वापरून चांगल्या कविता करायला लागेन आणि मग प्रामाणिकपणा जाईल. मनात नसलेलं कवितेत आलं तर त्याचा मला जास्त त्रास होईल. कलेच्या बाबतीत चांगलं-वाईट काही नसतं. जे कलाकाराच्या हृदयात असतं तेच त्याच्या कलेत उतरतं आणि जे बघणाऱ्यांच्या हृदयात असतं तेच त्यांना त्या कलेत दिसतं.

— मयुरेश कुलकर्णी